
पंढरपूर । Pandharpur
शेतकरी कर्जमाफीच्या अटींवरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळींमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली, तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याच मागणीसाठी त्यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना अतिरिक्त रक्कम आधी भरावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही अट अन्यायकारक असल्याचे सांगत रोहित पवार यांनी सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे जाऊन रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त करत, “शेतकरी वाचला नाही तर राज्य आणि देश कसा चालणार?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, कोणतेही आंदोलन राजकारणाच्या चष्म्यातून न पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या लढ्याच्या रूपात पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्यास संवादातून मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित पवार यांच्या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.




