Friday, September 25, 2026
HomeनगरAMC : महापालिका अग्निशमन दलाच्या चौघांना केंद्र सरकारचा पुरस्कार

AMC : महापालिका अग्निशमन दलाच्या चौघांना केंद्र सरकारचा पुरस्कार

कर्तव्यनिष्ठा आणि धाडसाबद्दल पदक देऊन होणार गौरव

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या महानिदेशालय (अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) यांच्या वतीने ‘अग्निशमन सेवा सप्ताह 2026’ च्या विशेष निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार मिळालेल्या राज्यातील 28 कर्मचार्‍यांपैकी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील चार जवानांना राष्ट्रीय स्तरावरील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर उत्तम मिसाळ (चीफ फायर ऑफिसर), वाहनचालक चिंधू राघू भांगरे (ड्रायव्हर ऑपरेटर), अग्निशमन मदतनीस (फायरमन हेल्पर) भरत अशोक पडगे व रवींद्र गोविंद साठे यांची निवड करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करत असतात. या जवानांनी आणीबाणीच्या आणि धोक्याच्या प्रसंगी सातत्याने दाखवलेले धाडस, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आलेख आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा या निकषांच्या आधारावर त्यांना या पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. देशातील जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेला प्रोत्साहन देऊन त्यांचा यथोचित गौरव करणे हा या सन्मानामागील मुख्य उद्देश आहे. या पुरस्काराचे स्वरूप कांस्य पदक आणि प्रशंसा प्रमाणपत्र असे आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संचालकांना पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार, संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 28 जवानांना या सन्मानासाठी पात्र घोषित करण्यात आले आहे. त्यात अहिल्यानगरच्या या चार जवानांचा समावेश असल्याने शहराच्या आणि महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशाबद्दल पुरस्कार प्राप्त जवानांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...