अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) आरोग्य सेवा, सुविधा व कार्यक्रमाबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) दिल्या जाणार्या दरमहा रँकिंगमध्ये अहिल्यानगर महापालिकेचा शेवटच्या पाच महापालिकांमध्ये समावेश झाला आहे. यापूर्वीही रँकिंग घसरल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Commissioner Yashwant Dange) यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्यावर कारवाई करत त्यांना अनिश्चित काळासाठी सक्तीच्या रजेवर (Compulsory Leave) पाठवले आहे.
डॉ.बोरगे (Medical Health Officer Dr. Anil Borge) यांना ऑगस्ट 2024 मध्ये दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या आरोग्य कार्यक्रमांचे प्रतिमाह असणारे रँकिंग हे राज्यातील महानगरपालिकांच्या (Ahilyanagar Municipal Corporation) शेवटच्या पाच गुणानुक्रमे आलेले आहे. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते. तरीही सुधारणा झाली नाही. त्यांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आहेत. त्यांच्या गैरवर्तनाबाबत वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येवूनही त्यांच्या वर्तनामध्ये कोणताही सकारात्मक बदल व कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही.
रँकिंगमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यांचे वर्तन हे बेजबाबदारपणाचे आहे. डॉ.बोरगे यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाचे व महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कामकाजाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत डॉ. बोरगे (Medical Health Officer Dr. Anil Borge) यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे आयुक्त डांगे यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. सतीश राजूरकर (Dr. Satish Rajurkar) यांच्याकडे सोपवण्याचे आदेश आयुक्त डांगे यांनी दिले आहेत.