Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र जगात एआयचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जगात एआयचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मुंबई टेक विक २०२६’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. ‍‍

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित ‘मुंबई टेक विक २०२६’ चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने प्रशासकीय कामकाजात एआयचा वापर केल्याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.

एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कम्प्युट-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ सुविधा निर्माण करत आहे. त्याद्वारे नवउद्योजक आणि संशोधकांना २ हजार जीपीयू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा परवडत नसल्यास नवकल्पना थांबते. त्यामुळे महाराष्ट्र शासन थेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे फडणवीस म्हणाले.

देशभरातून आणि विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना उद्देशून फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे आणि महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यभूमी आहे. येथे आधीच सक्षम परिसंस्था तयार झाली आहे. महाराष्ट्रासाठी काम करा, भारतासाठी काम करा आणि जगासाठी नवकल्पना घडवा, अशी साद फडणवीस यांनी घातली. राज्य सरकार केवळ इनक्युबेशन आणि अ‍ॅक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्या सोबत उभे राहण्यास तयार आहे, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

एआय सर्वांसाठी पाहिजे
“एथिकल एआय” हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध असला पाहिजे. तो केवळ मोठ्या कंपन्यांचा विशेषाधिकार राहता कामा नये. एमएसएमईंनाही त्याचा लाभ मिळायला हवा तसेच एआयमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, तसेच प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...