Thursday, March 13, 2025
Homeनगरशास्तीमाफी देऊनही फक्त 13 कोटी वसूल; मनपा आर्थिक अडचणीत

शास्तीमाफी देऊनही फक्त 13 कोटी वसूल; मनपा आर्थिक अडचणीत

जप्ती कारवाई तीव्र करण्याचे आयुक्तांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, थकबाकी 204 कोटींवर पोहोचली आहे. शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देऊनही अवघे 13 कोटीच वसूल झाल्याने महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढत आहे. वीजबिले, अत्यावश्यक खर्चाची देयके मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. वसुली होत नसल्याने विविध योजनांमध्ये स्वहिस्सा भरण्यासाठी महानगरपालिकेत निधी उपलब्ध नाही. अवघी 25 टक्केच वसुली झालेली असल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थकबाकीदारांवर जप्ती कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या कराची थकबाकी 215 कोटींवर पोहोचल्याने मागील महिन्यात आयुक्त डांगे यांनी 100 टक्के शास्ती माफ केली. त्याला मुदतवाढही दिली. तरीही फक्त 13 कोटींचीच वसुली झाली आहे. पाणी पुरवठ्याची वीजबिले, जलसंपदा विभागाची थकीत देणी, इतर अत्यावश्यक सेवांची देणी थकली आहेत. आजमितीला महानगरपालिकेला 496 कोटी रूपयांची देणी आहेत. सद्यस्थितीत 204 कोटी थकीत असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. विविध देणी देण्याबरोबरच शासकीय योजनांचा स्वहिस्सा भरण्यासाठी महानगरपालिकेत निधी उपलब्ध नाही.

राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी दिला आहे. यात 45 कोटी रूपयांचा स्वहिस्सा आहे. त्यापैकी सुमारे 10 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित 35 कोटी जमा करावे लागणार आहेत. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेत 19 कोटींचा स्वहिस्सा भरणे बाकी आहे. सोलर प्रकल्प व नाट्य संकुल 2 कोटी, फेज टू 5 कोटी तर, अमृत भुयारी गटार योजनेत 37 कोटींचा स्वहिस्सा भरणे बाकी आहे. वसुली वाढत नसल्याने स्वहिस्सा भरण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वसुली वाढत नसल्याने महानगरपालिकेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्ती कारवाई टाळावी.
– यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...