अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीनंतर महापालिकेकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया गतीमान होत असून, सन 2025-2026 या आर्थिक वर्षात मालमत्ता नोंदणीमधून महापालिकेला तब्बल 5 कोटी 26 लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण तीन हजार 420 मालमत्ताधारकांनी खरेदी किमतीच्या 1 टक्का शुल्क भरून महापालिकेकडे मालमत्तांची नोंदणी केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी-विक्री होते. मात्र, अनेक नागरिक खरेदी केल्यानंतर महापालिकेकडे नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, घरपट्टी व पाणीपट्टीची बिले जुन्या मालकाच्या नावानेच येत राहतात. पुढे अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन खरेदी, वारस नोंदणी, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी सर्व प्रकारच्या मालमत्तांची महापालिकेत नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या जुन्या कार्यालयात मालमत्ता नोंदणी विभाग कार्यरत असून तो करमूल्य निर्धारण विभागाअंतर्गत येतो.
येथे लिपिक अजय गाडे मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया हाताळतात. नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, करमूल्य निर्धारण अधिकारी विनायक जोशी किंवा संबंधित कर्मचार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, खरेदीनंतर नोंदणी टाळणार्या मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन नोंदणी पूर्ण करण्यास भाग पाडले जाणार आहे. या उपाययोजनांमुळे महसूल गळतीवर आळा बसणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
जुन्या मालमत्तांचे नव्याने मूल्यांकन
शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी 5 ते 20 वर्षांपूर्वी मालमत्ता खरेदी केलेली आहे. अशा मालमत्तांची नव्याने मूल्यनिर्धारण (व्हॅल्युएशन) करून त्यावर 1 टक्का शुल्क आकारले जात आहे. त्यानंतरच महापालिकेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे डांगे यांनी सांगितले.
सॉफ्टवेअर एकत्रिकरण
मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महापालिका प्रशासन लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाशी सॉफ्टवेअर एकत्रिकरण करणार आहे. या प्रणालीमुळे मालमत्ता खरेदीची नोंद होताच संबंधित माहिती थेट महापालिकेकडे पोहोचणार आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व हस्तांतरणाची अद्ययावत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहील.





