नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे आणि खोदकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून, यात आणखी एका निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील (Nashik Trimbakeshwar Road) पपया नर्सरीजवळ रस्त्याच्या न भरलेल्या साईड पट्टीमुळे दुचाकी घसरून १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा सिमेंट मिक्सरखाली चिरडून जागीच मृत्यू (Death) झाला आहे. श्रुती संतोष घाटोळ (वय १८) असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कसा घडला भीषण अपघात?
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम (Road Work) अद्याप अपूर्ण असतानाही हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पपया नर्सरी परिसरातून श्रुती घाटोळ आपल्या दुचाकीवरून जात असताना, रस्त्याच्या कडेला असलेल्या न भरलेल्या साईड पट्टीमध्ये तिच्या दुचाकीचे चाक अडकले. यामुळे तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट मुख्य रस्त्यावर फेकली गेली. नेमक्या त्याच क्षणी मागून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने ती चिरडली गेली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच अंत झाला. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात संतापाची लाट
नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या धोकादायक साईड पट्ट्या तात्काळ भरण्यात याव्यात, यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराला वारंवार लेखी निवेदने देऊन इशारा दिला होता. मात्र, कंत्राटदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या या बेजबाबदार कारभारामुळे एका तरुण मुलीचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.




