मुंबई | Mumbai
संसदेचे विशेष अधिवेशन उद्यापासून (दि.३० नोव्हेंबर) रोजी सुरू होत असून, या अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुक (DMK) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या विधेयकासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी ते म्हणाले की, “प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मंजूर झाल्यास संपूर्ण देशाला मोठा त्रास सहन करावा लागेल. आम्ही पक्षहित बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य देत आहोत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात पारदर्शकता दिसत नाही. मुंबई महापालिकेत आम्ही सीमांकन प्रक्रियेचा अनुभव घेतला आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि सीमांकन प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांना फायदा होईल, अशाच पद्धतीने मतदारसंघ बनवले जातील” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला ठाम विरोध असल्याचे सांगितले.
तसेच सीमांकन समितीवर (Delimitation Committee) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “तीन सदस्यीय समितीत ज्ञानेश कुमार यांच्यासह इतरांचा समावेश असून, त्यात विरोधकांचा सहभाग नाही. भाजपची (BJP) स्क्रिप्ट तयार असून, त्यावर केवळ सह्या मारून ती जनतेसमोर आणण्याचे काम समितीकडून केले जाईल,” अशी टीकाही त्यांनी केली.
शरद पवार आणि स्टॅलिन यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा
दरम्यान विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला निरोप आले नसतील का, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांनी ज्या मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली, त्याच मराठीजनांच्या हक्कांसाठी आम्ही विरोधाची ठाम भूमिका घेत आहोत. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांनी मतदारसंघांचे गणित लक्षात घेऊन आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असे त्यांनी म्हटले.




