नाशिक | Nashik
सोमवार (दि.३० नोव्हेंबर) पासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकासह तीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. या विधेयकाला विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुक (DMK) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून त्या दोन्ही पक्षांवर टीका केली जात आहे. दरम्यान यावर आता भाजप आमदार चित्रा वाघ (MLA Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांच्या पक्षाचे समर्थन करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी त्या म्हणाल्या की, “लोकसभेत (Loksabha) मतदारसंघ पुनर्रचना आणि ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयक येणार असून, हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे असे म्हणत महिला आरक्षण मिळू नये आणि मातृवंदन पुढे येऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्यांचे बुरखे फाडण्यात आल्याची टीका आमदार वाघ यांनी केली आहे. तसेच लोकसभेच्या जागा वाढण्याला विरोध आहे की महिला आरक्षणाला”, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार भाजपसोबत राहतील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या भूमिकेवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “हे महिला आरक्षण बिल असल्याने शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत मतदान करतील, असे सध्या वाटते. सर्वच पक्षांमध्ये महिला असून, या विधेयकाचा सर्वांनाच फायदा होणार असल्याने शरद पवार आमच्या सोबत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांवर टीका
दुसरीकडे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका करताना वाघ म्हणाल्या की, “रोहित पवार स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे मानत असतील, तर त्यांनी महिला विधेयकाला विरोध करावा, हीच का त्यांची विचारसरणी? ते घरात सख्या काकीलाही समर्थन देत नाहीत. रोहित पवार कोणती भूमिका घेतात, याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही.” तसेच खासदार संजय राऊत यांना आपण जास्त महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भेटीगाठी आणि नाशिकच्या घडामोडींवर भाष्य
विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून शरद पवारांची भेट घेतली जात असून, त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “ही भेट नेमकी कशासाठी आहे, याची मला कल्पना नाही; मात्र शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ते भेटत असावेत. लोकशाहीत कोण कोणाला भेटेल, यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. तर नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनभिज्ञता व्यक्त करत सांगितले की, मला याची कल्पना नाही; उलट शहराध्यक्ष म्हणून त्यांनी माझे स्वागत केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी याबाबत बोलणे झालेले नसून ते सध्या खूप व्यस्त असल्याचेही चित्रा वाघ यांनी नमूद केले.




