अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता सिध्दार्थनगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील 14 गाळेधारकांवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. गाळेधारकांकडे 12.44 लाख रूपयांची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे 25 कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सिध्दार्थनगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांकडे 12.44 लाखांची थकबाकी आहे.
तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिका कठोर कारवाई सुरू करणार आहे. त्यामुळे गाळेधारकांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन डांगे यांनी केले आहे.





