अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तब्बल 22 वर्षानंतर महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत 900 ते 4000 रूपयांपर्यंत वाढ केली आहे. महासभेत प्रशासक यशवंत डांगे यांनी या दरवाढीला मान्यता देतानाच यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षात 200 रूपयांची वाढ करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. सन 2025-2026 म्हणजेच नव्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून ही करवाढ लागू होणार आहे. त्यामुळे नळ धारकांना अर्धा इंचीसाठी 2 हजार 400, पाऊण इंचीसाठी 4 हजार 800, तर 1 इंचीसाठी 10 हजार रूपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे.
सन 2003 मध्ये अर्धा इंचीसाठी असलेल्या 806 रूपये दरात वाढ करून 1 हजार 500 रूपये पाणीपट्टी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सन 2016 मध्ये केवळ व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली. घरगुती पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव सन 2018 पासून सातत्याने फेटाळण्यात आला. प्रशासक नियुक्तीनंतरही निवडणुका असल्याने हा विषय टाळण्यात आला. तब्बल 22 वर्षे पाणीपट्टी वाढली नसली, तरी दुसरीकडे पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्थेवर होणार खर्च वर्षाकाठी सुमारे 40 कोटींवर पोहचला आहे.
त्यामुळे स्थायी समितीने घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ सुचवली होती. त्याला विरोध सुरू झाल्यानंतर प्रशासक डांगे यांनी 3000 ऐवजी 2400 रूपये दर निश्चित केला आहे. शहरातील नळधारकांना मीटरव्दारे 10 रूपये प्रति हजार लिटरने दर निश्चित करण्यात आला असून यात दरवर्षी 2 रूपये दर वाढणार आहे. दरम्यान, हद्दीबाहेर अर्धा इंचीसाठी 4 हजार 800 रूपये व मीटरव्दारे 20 रूपये प्रति हजार लिटर दर निश्चित करण्यात आला आहे. त्यात दरवर्षी 200 रूपये व मीटरव्दारे दरवर्षी 5 रूपये प्रति हजार लिटर दर वाढवण्यात येणार आहेत.