अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. घरात घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही पाणी सुरू ठेवणे, अंगण आणि घरासमोरील रस्ते पाण्याने धुण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांमुळे पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने महापालिकेने संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, केवळ महापालिकेच्या नळाचे पाणी वापरूनच नव्हे, तर खासगी बोअरवेलचे पाणी वापरून अंगण, रस्ते किंवा अन्य सार्वजनिक जागा धुतल्यासही दंड आकारण्यात येणार आहे. पाण्याचा स्रोत कोणता आहे, यापेक्षा त्याचा अनावश्यक वापर टाळणे महत्त्वाचे असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिकेकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 70 टक्के व्यावसायिक, तर 30 टक्के बंगलेधारकांचा समावेश आहे. विशेषतः दुकानांसमोरील जागा, व्यावसायिक आस्थापनांचे परिसर, बंगल्यांचे अंगण आणि घरासमोरील रस्ते पाण्याने धुणार्यांवर प्रशासनाचे लक्ष आहे.
शहरातील वाहन वॉशिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असल्याने आता या व्यवसायांवरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात वॉशिंग सेंटर बंद करण्याच्या दृष्टीने प्रभाग अधिकार्यांमार्फत तपासणी आणि सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यंदाचे कमी पर्जन्यमान आणि एल निनोची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता आगामी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यांत पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घरपट्टी बिलात दंड
शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा झाल्यानंतर काही नागरिकांकडून पाण्याचा अनावश्यक वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा प्रशासनाला माहिती भेटल्यानंतर पथक कारवाईला जाते. त्यावेळी काही नागरिकांकडून दंड भरण्यास विरोध केला जात असल्याने अशा प्रकरणांत दंडाची रक्कम संबंधितांच्या घरपट्टी बिलामध्ये समाविष्ट केली जात आहे.




