Monday, May 20, 2024
Homeजळगावअन् अजित पवारांनी थोपविले देवकरांचे बंड

अन् अजित पवारांनी थोपविले देवकरांचे बंड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वर्षभरापूर्वी सुत्रे हाती घेतलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्षपद टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Former NCP Minister Gulabrao Deokar) यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी विरोधकांशी हातमिळवणी करून बंड (rebellion)पुकारण्याची तयारी केली होती. मात्र या बंडाची कुणकूण लागताच राष्ट्रवादीचे नेते ना. अजित पवार (Ajit Pawar)यांनी त्यांच्या स्टाईलने गुलाबराव देवकरांचे बंड काही क्षणातच थोपविले. त्यामुळेच देवकरांनी आज जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडले.

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद हे मोठे प्रतिष्ठेचे आहे. या प्रतिष्ठेपोटीच गत वर्षी निवडणुक झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सात वर्ष चेअरमन राहिलेल्या त्यांच्या कन्येसाठी पुन्हा लॉबिंग केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी चेअरमनपदाची माळ गुलाबराव देवकरांच्या गळ्यात पडली.

अन् देवकरांनी केला लॉबिंगचा प्रयत्न

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या करारानुसार एक वर्षानंतर चेअरमन बदलाच्या हालाचाली सुरू झाल्या. या हालचाली देवकरांना मात्र मंजूर नव्हत्या. चेअरमन म्हणून केवळ एक वर्ष मिळालेली संधी ही अधिक काळ टिकावी म्हणून गुलाबराव देवकर यांनीही लॉबिंग करण्याला सुरूवात केली.

संचालकांच्या बैठकीत निश्चीत झाल्यानंतर देवकर सोमवारी राजीनामा देणार होते. मात्र सोमवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्याने या विषयाला वेगळेच वळण मिळत होते.

सत्ताधारी मंत्र्यांशी हातमिळवणी करून चेअरमनपद टिकवता येईल का? याचीही चाचपणी करण्यात आली. मात्र यात यश येणार नाही याची चाहूल लागल्याने पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ नेऊन अध्यक्षपद वाचविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

कुणकूण लागताच पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

अध्यक्षपद वाचविण्यासाठी पडद्याआड झालेल्या घडामोडींची इथ्यंभूत माहिती राष्ट्रवादीचे नेते ना. अजित पवार यांच्या कानापर्यंत पोहचल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडी माहिती होताच अजित पवार यांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येऊन देवकरांना राजीनामा देण्यास सांगितले. पवारांचा आदेश होताच युटर्न घेत देवकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मंगळवारी दिला.

वर्षभराच्या कालावधीत देवकर यांनी दगडी बँकेत चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अधिक कालावधी मिळावा अशी त्यांच्या समर्थकांची मागणी असल्याचे कळते. समर्थकांची भूमिका चांगली असली तरी त्यामुळे घडलेल्या घडामोडीमुळे देवकरांच्या निष्ठेवर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या