उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांकडून भरती करून देण्याच्या नावाखाली एक लाख रुपयांची मागणी होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. मात्र, या प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून बाल विकास प्रकल्प कार्यालयाने अशा प्रकारांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये रिक्त पदांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार पात्र उमेदवारांची निवड गुणांच्या आधारे केली जाते. मात्र, अर्जदारांची यादी काही एजंटांकडे उपलब्ध होत असल्याचा आरोप केला जात आहे. या यादीच्या आधारे संबंधित महिलांशी संपर्क साधून भरती करून देतो असे सांगत पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे.काही अर्जदार महिलांकडून किमान एक लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित एजंटचा काही अधिकार्यांशी संपर्क असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.
मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी झालेल्या काही भरती प्रक्रियेतही पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.याशिवाय, काही उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संबंधित कागदपत्रांची मूळ स्त्रोतांकडून सखोल पडताळणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते, अशी चर्चा अर्जदार महिलांकडून सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला रोजगाराच्या अपेक्षेने अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी अर्ज करतात. अशा परिस्थितीत भरतीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास त्याला बळी न पडता तातडीने संबंधित प्रशासन किंवा पोलिसांकडे तक्रार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भरती पूर्णपणे गुणांच्या आधारेच
राहुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया ही शासनाच्या नियमानुसार आणि उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, मिळालेल्या गुणांच्या आधारेच पारदर्शकपणे केली जात आहे. आमच्या नावाने किंवा भरती करून देण्याच्या नावाखाली कोणी पैशांची मागणी करत असल्यास त्याची तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी. अशा व्यक्तींचा बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी कोणताही संबंध नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
– गजानन शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी, राहुरी




