Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबहुआयामी तारा निखळला! अनिल अवचट यांच्या निधनानंतर अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

बहुआयामी तारा निखळला! अनिल अवचट यांच्या निधनानंतर अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे | Pune

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (anil awachat) यांचे आज निधन झाले. पुण्यातील (Pune) राहत्या घरी अवचट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे…

- Advertisement -

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटद्वारे अनिल अवचट यांना श्रध्दांजली वाहली. शरद पवार यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले…

प्रख्यात लेखक आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ अनिल अवचट यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. लेखक, सामाजिक कार्य म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून आपण येणाऱ्या पिढ्यांना माहिती असावे, असे ते नेहमी बोलून दाखवीत. तीच ओळख जपण्याचे कार्य त्यांनी केले. ‘मुक्तांगण‘च्या माध्यमातून त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला. त्यांनी पत्रकारिता सुद्धा केली. पण त्यातील व्यावसायिकतेला कायम विरोध केला. वंचितांचे प्रश्न सोडविणे याला ते कायम महत्त्व देत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतीशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘मुक्तांगण’च्या (Muktangan) माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले.

वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असे बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, ‘मुक्तांगण’ परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला – भुजबळ

चतुरस्त्र लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला असून महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला आहे. डॉ. अनिल अवचट यांनी दलित, मागासवर्गीय, मजूर, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपूल लेखन केले आहे. त्यांनी सुरू केलल्या मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक हे व्यसनापासून मुक्त झाले.

त्यामुळे फक्त केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ. अवचट यांच्या निधनाने एका हरहुन्नरी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनाने अवचट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय अवचट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र थोर समाजसेवकाला मुकला : संजय राऊत

अनिल अवचट यांच्या निधनाची बातमी कळाली, मुक्तांगणाच्या माध्यमातून जे काम केलं ते महाराष्ट्राला, देशाला जगाला आदर्श देणारे होते. तरुण पिढीवर ज्याप्रकारे अंमली पदार्थांचा अमल आहे. अवचट यांनी नशा मुक्तीच्या कामात झोकून दिलं आहे. मुक्तांगणामधून त्यांनी अनेक कुटुंब अनेक तरुणांना सावरले. अत्यंत संवेदनशील लेखक होते, पत्रकार होते चांगले वक्ते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका थोर समाज सेवक लेखकाला मुकलाय. मी शिवसेनेतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) श्रद्धांजली वाहली.

सुप्रिया सुळेंनी वाहिली आदरांजली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यांचे निधन झाले. मुक्तांगण च्या माध्यमातून व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले होते. त्यांच्या निधनामुळे एक सामाजिक जाण व भान असणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या