मुंबई । Mumbai
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या सनसनाटी दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर अत्यंत वैयक्तिक आणि गंभीर आरोप करत जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.
अनिल परब यांनी थेट रामदास कदम यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अनिल परब यांनी रामदास कदम यांचे पुत्र आणि भाजप-शिंदे सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही आव्हान दिले आहे. परब म्हणाले, “१९९३ साली रामदास कदम यांच्या पत्नीने, ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले होते. तिने आत्महत्या केली होती की तिला जाळण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. जर रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल, तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी.” रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, यावरून काय राजकारण झाले, हे सर्वांना माहिती आहे, असेही परब यांनी यावेळी सांगितले.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत अनिल परब यांनी त्यांची कठोर शब्दांत टीका केली. “रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला आहे. पोरी-बाळी नाचवणाऱ्याला (शिंदे गटाचे मेळावे) उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती,” असे म्हणत परब यांनी कदमांवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या वेळी आपण विभागप्रमुख असल्याने २४ तास मातोश्रीवर उपस्थित होतो आणि घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण साक्षीदार आहोत, असे परब यांनी स्पष्ट केले.
रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर तब्बल १२-१४ वर्षांनी हे दावे का केले, असा थेट प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. परब म्हणाले, “आता १४-१५ वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केले. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे, ती त्यांनी त्यावेळी का केली नाही? गेली १२ वर्षे तुमचे तोंड बंद का होते?”
रामदास कदम यांचा दावा ‘१०० टक्के खोटा’ असल्याचे परब यांनी ठामपणे सांगितले. “बाळासाहेब यांना भेटायला लोकांची प्रचंड गर्दी होती. रामदास कदम यांनी विचार करायला हवा होता, कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का?” असे म्हणत त्यांनी कदमांच्या वक्तव्यातील त्रुटींवर बोट ठेवले.
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावरील अनेक गंभीर आरोपांची जंत्रीच सादर केली. “रामदास कदम यांचे १०० अपराध झालेले आहेत, ज्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत,” असा दावा करत परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. मुख्यमंत्री का वाचवत आहेत? अशी तुमची काय मजबुरी आहे की, ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवत आहात?” परब यांनी कदम यांच्यावर डान्सबार चालवणे, वाळूचोरी, दादागिरी आणि जमिनी लाटणे असे गंभीर आरोप केले.
“माझ्याकडे सगळी प्रकरणे आली आहेत. कोणाकोणाच्या जमिनी, घरे यांनी खाल्ली आहेत. कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केले आहे,” असे ते म्हणाले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, रामदास कदम यांच्या पुतण्याच्या आत्महत्येचा उल्लेख करत परब यांनी ती आत्महत्या का केली, याचा शोध घेण्याची मागणी केली. “त्याच्या आत्महत्येचे कारण देखील बाहेर आलं पाहिजे,” अशी मागणी करत अनिल परब यांनी या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच लक्ष घालण्याचे आव्हान दिले.




