अहिल्यानगर, मुंबई |प्रतिनिधी| Ahilyanagar
संपूर्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. देशभरातील तरूणांची साथ या पार्टीला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीने भाजप आणि काँग्रेसला सोशल मीडियावरील फॉलोअर्सबाबत मागे टाकले होते. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीला राजकीय नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि वंचित बहुजन आघाडीने नेते प्रकाश आंबेडकर यांनी या पार्टीचे समर्थन केले आहे.

काय म्हणाले अण्णा..
झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता? हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र, यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की, झुरळ म्हटलं असेल तरी आणि झुरळ हे नाव योग्य वाटत नसलं तरी या कॉकरोच जनता पार्टीच्या मागे मोठ्या प्रमाणात तरुण उभे राहिले आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. शासनाने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केले.
लोक आयुक्तांसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ
केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोक आयुक्त गरजेचे आहे. सरकारने प्रत्येक खात्याला आयुक्त नेमलेला आहे. पण लोकांचा आयुक्त कुठे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लोकआयुक्त कायदा मान्य केला. मात्र, अद्याप लोक आयुक्त यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे आता लोक आयुक्तांसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येते का? अशी परिस्थिती निर्माण झाल्याची नाराजी हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांना म्हणाले की, काळजी करू नका, कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी, देशाच्या सीजीआयने माफी मागावी. त्यांनी केलेलं विधान हे त्या याचिकेबद्दल होत हे त्यांनी सांगायला हवं होत असं विधान केले होते.




