Tuesday, February 17, 2026
HomeनगरAhilyanagar : एपीआय गीते यांची राहुरीला बदली

Ahilyanagar : एपीआय गीते यांची राहुरीला बदली

खुनाचा गुन्हा दडपल्याचा ठपका || खातेनिहाय चौकशी सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय 42) यांच्या मारहाणीतून झालेल्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून तपास अधिकारी तथा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडे तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. दरम्यान, गीते यांची खातेनिहाय चौकशी सुरू असून अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने हे चौकशी करत आहेत. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

- Advertisement -

6 मार्च 2025 रोजी मिठू दत्त यांना निर्घृण मारहाण करण्यात आली. सुरूवातीला त्यांना अहिल्यानगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. 23 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. तथापि, 29 मार्च रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात केवळ ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली.
पुढील तपास स्वतः एपीआय गीते यांनी हाताळला; मात्र खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रार झाल्यानंतर अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ दखल घेत सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे चौकशी सोपविली. गडकरी यांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. मिठू दत्त यांचा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झालेला खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पाच जणांविरूध्द खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

सुरुवातीपासून खुनाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? घटनेचे व्हिडिओ पुरावे असतानाही प्रकरण ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून का ठेवण्यात आले? आरोपींशी आर्थिक तडजोड झाली का? तपासात जाणीवपूर्वक विलंब का करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, गडकरी यांच्या तपासामुळे गीते यांच्या भूमिकेबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. गीते यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी दिले असून ही चौकशी उपअधीक्षक वमने यांच्याकडून सुरू आहे. चौकशी सुरू झाल्यानंतरही गीते यांचे प्रभारीपद कायम होते. आता मात्र अधीक्षक घार्गे यांनी त्यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात केली आहे. खातेनिहाय चौकशी पूर्ण झाल्यानंतर उपअधीक्षक वमने हे अधीक्षक घार्गे यांना अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पुढील कारवाई अपेक्षित आहे.

एपीआय वारूळे प्रभारी
अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, रस्तालूट, चोरी व घरफोड्यांच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. रूईछत्तीशी येथे सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागले होते. हे आंदोलन सोडविण्यासाठी स्वतः अधीक्षक घार्गे यांना जावे लागले होते. त्यामुळे तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, सहाय्यक निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला असून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. खमक्या अधिकारी म्हणून ओळख असलेले वारूळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची घडी बसवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Harshwardhan Sapkal : जीभ कापा पण भाजपला उघडे पडणारच – काँग्रेस...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अदानी-अंबानी (Adani and Ambani) आणि अमेरिकेचे (America) भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून माझी जीभ कापायची...