मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
अदानी-अंबानी (Adani and Ambani) आणि अमेरिकेचे (America) भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा. पण मी थांबणार नाही, भाजपचा पर्दाफाश करतच राहणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी दिला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना टिपू सुलतान (Tipu Sultan) यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान केले होते. या विधानावरून भाजप आणि काँग्रेसमधील (BJP and Congress) वाद टिपेला पोहचला असताना भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्याला १० लाख तर तोंडाला काळे फासणाऱ्याला २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भाजप आमदाराच्या या घोषणेला सपकाळ यांनी आज उत्तर दिले.
माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे (Farmer) अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल आणि चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती महान आहे. परंतु भाजपने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजप सरकारकडे उत्तर नाही. या प्रश्नांवर भाजपला पडदा टाकायचा असल्याने यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.




