Friday, July 24, 2026
HomeनगरRahuri : आरडगाव व देवळाली प्रवरा येथे दोन खासगी सावकारांवर छापे

Rahuri : आरडगाव व देवळाली प्रवरा येथे दोन खासगी सावकारांवर छापे

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आरडगाव तसेच देवळाली प्रवरा येथील बेकायदेशीर सावकारी व्यवहारांवर सहाय्यक निबंधक विभागाने छापे टाकून मोठी कारवाई केली. संशयित सावकारांच्या घरावर छापा टाकून जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तांदुळवाडी येथील एका शेतकर्‍याने तर देवळाली प्रवरा येथील एका महिलेने संबंधित सावकारांविरोधात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

या तक्रारीत व्याजाने पैसे देताना शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेणे, त्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेणे, तसेच परस्पर विक्री करून अतिरिक्त पैशांची मागणी करणे असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकारामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचीही माहिती पुढे आली आहे. तक्रारीची दखल घेत सहायक निबंधक विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधिताच्या घरावर छापा टाकला. या धाडीत जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे, करारनामे, बोजापत्रे, पावत्या तसेच इतर महत्त्वाच्या नोंदींची तपासणी करण्यात आली.

प्राथमिक तपासात काही कागदपत्रे संशयास्पद आढळल्याचे समजते, मात्र अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. तांदुळवाडी व देवळाली प्रवरा येथे गेल्या काही दिवसांपासून संबंधित सावकारांच्या कारभाराबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होती. अनेक नागरिकांनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे.

संबंधित प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत. ही कारवाई राहुरीचे सहायक निबंधक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी (श्रेणी-1) व पथक प्रमुख पी. ए. थोरवे, सहायक सहकार अधिकारी, पथक सहायक श्रीमती एम. ए. शेख, गिरीष मुसळे, बाळासाहेब रासकर, सविता माने, सागर म्हसे या पथकाने केली.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...