Wednesday, October 28, 2026
HomeनगरRahata : ‘अर्णब’ चक्रीवादळही उत्तरेकडेच जाणार

Rahata : ‘अर्णब’ चक्रीवादळही उत्तरेकडेच जाणार

अहिल्यानगर जिल्ह्यात 29 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढुन 27 आक्टोबर 2026 रोजी त्याचे अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होऊन त्याचे पुढे अर्णब चक्रीवादळात रुपांतर होत आहे. हे अर्णब चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर विशाखापट्टणमच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीनजीक वार्‍याचा वेग ताशी 115 ते 140 किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वादळवारे वाहुन नुकसान होईल. या प्रभावक्षेत्रातील विशाखापट्टणम, काकीनाडा, कृष्णा, गुंटूरसह अनेक जिल्ह्यांना फटका बसू शकतो, असे भाकीत जलसंपदा चे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी केले आहे.

- Advertisement -

अर्णब हे बंगाली भाषेतील नाव बांगलादेशने सुचवले असून त्याचा अर्थ समुद्र वा महासागर असा आहे. उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या नामकरणासाठी भारतासह 13 देशांनी प्रत्येकी 13 म्हणजे एकुण 169 नावे दिली आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांना इंग्रजी वर्णाक्षरानुसार पुर्व निर्धारित क्रमाने नावे दिली जातात. वार्‍याचा वेग ताशी 63 किमीच्या पुढे गेल्यानंतर कमी दाबाचे चक्रीवादळात रुपांतर होऊन त्याचे नामकरण केलेजाते. यापुढे येणार्‍या चक्रीवादळाचे नाव तामीळ भाषेतील ‘मुराशी’ म्हणजे नगारा असणार आहे.

अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील नागपुरसह यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. अहिल्यानगरसह उर्वरीत महाराष्ट्रात 29 आक्टोबर ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण राहील तसेच आर्द्रता वाढुन तापमानात अंशतः घट होईल. 29 ते 31 आक्टोबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची एखादी किरकोळ सर किंवा मेघगर्जना शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यात निश्चितता नाही.

अर्णब चक्रीवादळामुळे पावसाचे पुनरागमन होणार म्हणून आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु हे चक्रीवादळ आंध्रप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड, झारखंड मार्गे उत्तरप्रदेशकडे जाणार असल्याने पुर्व विदर्भ वगळता या चक्रीवादळामुळे इतर भागात दमदार पावसाची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकांचे नियोजन करण्याशिवाय पर्याय नाही. सद्यस्थितीत सिंचन प्रकल्पांच्या आवर्तनाचे वेळापत्रक आणि नियोजन हे मका, तूर, कांदा यासारख्या रब्बी पिकाबरोबरच ऊस, फळबागा यांची गरज विचारात घेऊन केले तरच रब्बी काही प्रमाणात तरी हाती लागेल.

महत्वाची बाब म्हणजे पशुधन विशेषतः दुग्धव्यवसायाचा आधारस्तंभ असलेले पशुधन वाचवण्यासाठी मका तसेच ऊसाचा चारा म्हणून वापर होत असल्याने ती चारा पिके जगविण्यासाठी सुयोग्य तसेच क्षेत्रिय परीस्थितीनुरुप सिंचन कार्यक्रम अपेक्षित आहे. चारा तसेच रब्बी पिकांना यथोचित वेळी पाणी मिळाले नाही तर खरीपाप्रमाणे रब्बीही हातातुन जाईल. अपुरा पाऊस, पावसाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी आणि त्यामुळे उद्भवलेल्या भीषण दुष्काळी स्थितीत कालव्याचे पाणी हाच एकमेव पर्याय आहे. पावसाची मुळीच शक्यता नसल्याने सिंचन आवर्तन नियोजन आणि अंमलबजावणी कार्यक्षमतेने होणे अत्यंत गरजेचे आहे, असे ही श्री. निर्मळ म्हणाले.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूरकरांना मिळणार आठ दिवसांनी पाणी!

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur सलग 365 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या श्रीरामपूर नगर परिषदेवर आठ दिवसांतून एकदा म्हणजे दर बुधवारी पाणी पुरवठा करण्याची नामुष्की श्रीरामपूर...