पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील मिरी व शिरसाठवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या सुगंधी तंबाखू विकणार्या चौघांवर छापा टाकत सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार धाकराव, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, विजय ठोंबरे, महिला कॉन्स्टेबल सारिका दरेकर यांच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील कड़गाय रोडवरील मिरपगार वस्तीवर छापा टाकला.
या छाप्यात अमोल रमाकांत मिरपगार, सोमनाथ शामवेल मिरपगार (दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्याकडे साठ हजार रुपये किंमतीचा शरीरास अपायकारक असणार्या सुगंधी तंबाखू आढळून आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा छापा पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील सानपवस्ती येथील राहुल सानप (रा. सानपवस्ती, शिरसाठवाडी, ता. पाथर्डी), राजूभाई उर्फ फरीद मेमन उर्फ मोहम्मद फरीद मेमन (रा. बाबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर टाकला असता त्यांच्याकडे सुगंधी तंबाखू व इतर साहित्य मिळून सुमारे 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. याकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा आतार यांच्या फिर्यादीवरून यरील दोघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांत एकूण तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.