अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बोल्हेगाव येथील व्यावसायिक किरण तानाजी भोसले (वय 40) यांनी दुकानातील 6 लाख 49 हजार रूपयांची थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी अश्विनी भोसले यांनी केला असून, ग्राहक सचिन जगन्नाथ दाताळ (रा. बोल्हेगाव) याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद तोफखाना पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी सचिन दाताळ विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
फिर्यादीनुसार, किरण भोसले हे बोल्हेगावात बिल्डिंग मटेरियलचे दुकान चालवत होते. सचिन दाताळ याच्याशी त्यांची ओळख झाली होती. 10 जून 2025 पासून दाताळ याने दुकानातून वेळोवेळी सिमेंट खरेदी केली. मात्र, त्याच्याकडे सिमेंटच्या खरेदीपोटी 6 लाख 49 हजार 500 रूपयांची थकबाकी राहिली. थकबाकी मिळविण्यासाठी भोसले कुटुंबीयांनी दाताळ याच्या घरी जाऊन विचारणा केली होती. त्यानंतरही पैसे मिळाले नसल्याने किरण भोसले हे दाताळ याला वारंवार फोन करून थकबाकी देण्याची विनंती करीत होते. मात्र, त्याचा फोन बंद असल्याने संपर्क होत नव्हता.
दरम्यान, भोसले यांनी दुसर्या दुकानदारांकडून उधारीवर माल घेऊन तो दाताळ याला दिला होता. त्यामुळे संबंधित दुकानदारांकडूनही भोसले यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला जात होता. परिणामी त्यांचा व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आणि ते मानसिक तणावात होते, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांनी 3 डिसेंबर 2025 रोजी दाताळ याच्याविरूध्द तोफखाना पोलिसांकडे तक्रारी अर्जही दिला होता. त्यानंतरही थकबाकीची रक्कम मिळाली नसल्याने किरण भोसले तणावात असल्याचे पत्नीने फिर्यादीत नमूद केले आहे.दरम्यान, किरण भोसले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (27 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आले. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




