मुंबई | वृत्तसंस्था
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०० ट्रक रवाना केल्याची माहिती देत, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेचा दाखला दिला. त्यांनी आरोप केला की, “२०१९ मध्ये जनतेने युतीला मतदान केले होते, पण वैयक्तिक स्वार्थासाठी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली गेली, ती खरी ‘व्होटचोरी’ आणि लोकशाहीवर पडलेला दरोडा होता त्यामुळे शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शेतकरी मदतकार्याबरोबरच शिवसेनेतील राजकीय संघर्षही केंद्रस्थानी राहिला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आवाहन
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या दसरा मेळाव्याच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता. दरवर्षी मेळाव्यात होणारे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांच्या मदतीवर भर देण्यात आला. दुष्काळग्रस्त भागांतील शिवसैनिकांनी मुंबईत येण्याऐवजी थेट गावांमध्ये जाऊन संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करावी, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले होते. मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी गावोगावी पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. “शेतकरी संकटात आहे. त्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही,” असा संदेश त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या घरापर्यंत मदत पोहोचवणे आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देणे, हे शिवसैनिकांनी आपले कर्तव्य मानावे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर भगवा घेऊन शिवसैनिक पोहोचेल आणि तो रिकाम्या हाताने परतणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात मदत मिळावी, यासाठी ‘आनंदाचा शिधा’ घेऊन १०० ट्रक रवाना करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही मदतीची पहिली फेरी असून, त्यानंतर दुसरी आणि तिसरी फेरीही राबवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.




