पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
संत भगवानबाबांनी 1951 मध्ये विजयादशमीच्या दिवशी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या अमृत महोत्सवी वर्षात दसर्याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री यांची चतुर्थ महंतपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी विधिवत त्यांना गादीवर विराजमान केले. दुष्काळी परिस्थितीमुळे सोहळा साधेपणाने झाला; मात्र हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. कृष्णा महाराज मूळचे तेलंगणातील असून, सुमारे 17 वर्षांपूर्वी ते अध्यापनासाठी भगवानगडावर आले.
त्यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतले असून, डॉ. नामदेवशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी व अन्य धार्मिक ग्रंथांचे 12 वर्षे अध्ययन केले. त्यानंतर एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणून त्यांनी सुमारे तीन वर्षे काम पाहिले. दोन वर्षांपूर्वी उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाल्यानंतर एकनाथवाडीतील ग्रामस्थांनी त्यांना रथातून ढोल-ताशे, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भगवानगडावर आणले होते. निरोपाच्या वेळी ग्रामस्थ भावूक झाले होते. महंतपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कृष्णा महाराजांनी भगवानगडाच्या परंपरांचे पालन करणार असल्याचे सांगितले.
संत भगवानबाबांनी सुरू केलेली परंपरा वैकुंठवासी भीमसिंह महाराज आणि डॉ. नामदेवशास्त्री यांनी पुढे नेली असून, गुरूंच्या आदेशानुसारच आपण कामकाज करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पदावर आपली निवड होईल, असे कधी वाटले नव्हते; वारकरी संप्रदायात गुरुकृपा आणि गुरूंच्या आदेशाला महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. विजयादशमीच्या सकाळपासून भगवानबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. कृष्णा महाराजांच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी झाली. त्यांच्या हस्ते सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला.
दर्शनानंतर अनेक भाविक सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन डॉ. नामदेवशास्त्री आणि कृष्णा महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी गडावरील ज्ञानेश्वर माउली मंदिराच्या बांधकामाची पाहणीही केली. यापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रताप ढाकणे यांनीही समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गोकुळ दौंड, गहिनीनाथ शिरसाठ, महारुद्र कीर्तने, भगवानगड ट्रस्टचे विश्वस्त पांडुरंग आंधळे, अॅड. जे. टी. बटुळे, राजू पाटील अंधुरे, भास्कर खेडकर आणि डॉ. राजेंद्र खेडकर आदी उपस्थित होते.
नामदेव महाराज शास्त्री करणार ज्ञानेश्वरी भावानुवाद
दरम्यान, डॉ. नामदेवशास्त्री यांनी सामाजिक जीवनातून निवृत्ती घेत उर्वरित आयुष्य ज्ञानेश्वरीचा भावानुवाद लिहिण्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वी अनेक ग्रंथांचे लेखन केले असून, पुढेही त्यांचे लेखन व ग्रंथनिर्मिती सुरू राहणार आहे.




