करोना अर्थात कोविड 19 च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे ! कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांच्या संख्येत थोडी घट दिसून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेत काही अंशी समाधान आहे . पण..
शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पावसाळी वातावरणामुळे दरवर्षी त्रास देणारे आजार जसे की टॉयफॉइड, मलेरिया, डेंग्यू फ़ीव्हर व चिकनगुनिया ह्यांचा प्रभाव पण वाढणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सजग व सावध राहणे जरुरीचे आहे !
कारण वरील उल्लेख केलेल्या आजारांमध्ये व जी वैश्विक महामारी सध्या धुमाकूळ घालत आहे. त्या कोरोनामध्ये ताप येणे हे लक्षण सामायिक आहे ! कोरोनामध्ये 80 टक्के रुग्णांमध्ये ताप असतोच व त्यासोबत इतर लक्षणे असतात.सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारचा गोंधळ उडतो की आलेला ताप हा कसला आहे, कोरोनाचा कि इतर आजारांचा !
बर्याच वेळा उपचार, निदान करणारे फॅमिली फिजिशयनही गोंधळात पडतात किंवा रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळून दिरंगाई करतात, डॉक्टरांनी सांगूनसुद्धा कोरोना चाचणी सर्वप्रथम करत नाही अन् त्यामुळे मात्र तापाचे रुग्ण गावात फिरत असतात व कोरोना असला तर त्याचा फैलाव करत असतात !
ताप आल्यानंतर जर सुरुवातीचे 3-6 दिवस दुर्लक्षित झाले, व कोरोनाची चाचणी न करता, निदान न झाल्यामुळे उपचारास दिरंगाई झाल्यास असे कोरोनाग्रस्त रुग्ण हे अतिगंभीर होऊ शकतात व इतरांना ही ते कोरोनाचा संसर्ग करू शकतात !
त्यामुळे सर्वसाधारणपणे ताप हा कुठल्या आजाराचा कसा असतो, कोरोनाचा कसा असतो, सोबतची लक्षणे व चाचण्यांची जुजबी माहिती असणे ह्या काळात हितकारक आहे !
(1) टॉयफॉइड – ताप आल्यानंतर रक्त तपासणीअंती टॉयफॉइड आहे असे सांगण्यात येते व त्यावर उपचार केले जातात व कोरोनाकडे दुर्लक्ष होते! पण लक्षात ठेवले पाहिजे की सद्यःस्थितीत टॉयफॉइडसाठी केली जाणारी विडाल टेस्ट ही अर्थहीन मानली जात आहे व हिचे रिपोर्ट व टायटर हे चुकीचे येत आहेत. म्हणजे अनेक रुग्णांमध्ये टॉयफॉइडचा आजार नसूनही टॉयफॉइड असल्याचा अहवाल प्राप्त होत आहे !
जर एखाद्या रुग्णास डॉक्टरांकरवी तपासणीअंती टॉयफॉइडचीच शक्यता वाटत असेल तर खात्रीसाठी ब्लड कल्चर ह्या रक्तचाचणीचाच पर्याय सद्यःस्थितीत ग्राह्य धरला जात आहे !
टॉयफॉइडचा ताप हा तीव्र स्वरूपाचा असतो व संपूर्ण दिवसभर असतो व इतर कोरोनाची लक्षणे त्याबरोबर नसतात !
(2) डेंग्यू फीव्हर – डेंग्यूच्या आजारात तीव्र स्वरूपाचा ताप असतो. स्नायूवेदना असतात व अंगावर पुरळ जास्त प्रमाणात असते . डोकेदुखीचे वैशिष्ट्ये म्हणजे डोळ्याच्या अवती-भवतीचा भागाचा ह्यात समावेश असतो व काही रुग्णांमध्ये दात व हिरड्यात सूक्ष्म स्वरूपात रक्तस्त्राव दिसून येतो! रक्ततपासणीत प्लेटलेट काउंट कमी असतो !
(3) मलेरिया – मलेरियाचा ताप हा तीव्र स्वरूपाचा असतो व तो बर्याचवेळा थंडीसोबत येतो. डोकेदुखी व उलटीची लक्षणे असतात. मलेरियाचे निदान रॅपिड अँटिजेन टेस्ट व पेरिफरल ब्लड स्मिअर टेस्टद्वारे अचूक होऊ शकते !
(4) चिकुनगुनिया – सध्या ह्याचे रुग्ण आपल्याकडे आढळून येत नाही. ह्यात अतिताप, तीव्र पाठदुखी व सांधेदुखी असते. डोकेदुखी व त्वचेवर पुरळ पण असते! डोळे दुखणे व डोळ्यांसमोर प्रकाश सहन न होणे अशी इतर लक्षणे दिसतात !
(5) कोरोनाचा ताप हा सुरुवातीला सौम्य स्वरूपाचा असतो ! तो येत जात राहतो. अतिश्रमाने जाणवू शकतो व नंतर प्रत्येक दिवशी तो वाढत जातो ! डोकेदुखी ही शक्यतो एका बाजूला व वरच्या बाजूला असते व तीव्र स्वरूपाची असते.
चव जाणे, वास न येणे व गळ्यात दुखणे व सर्दी खोकल्यासोबत ताप असतो. काहीवेळेस अतिसार पण असतो ! लक्षात घेतले पाहिजे की सद्यःस्थितीत ताप, प्रचंड अंगदुखी व थकवा ही तीन लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत ! वृद्ध रुग्णांमध्ये मात्र बर्याच वेळा ताप दिसून येत नाही तर नेहमीपेक्षा वेगळा असा तीव्र स्वरूपाचा ताप हा जास्त प्रमाणात संसर्ग शरीरात पसरला असेल, फुफ्फुसात लागण झाली असेल किंवा इतर काही आजार सोबत असतील तरच कोरोनात आढळतो ! कोरोनाच्या निदानासाठी असलेल्या रॅपिड अँटिजन स्वॅब टेस्ट, आर टी पीसीआर स्वॅब टेस्ट ह्या नाकातील व घशातील द्राव्यच्या माध्यमातून केल्या जातात ! ह्याबाबतीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये बरेच गैरसमज आहे !
लक्षात ठेवले पाहिजे की, ह्या दोन्ही टेस्टला जरी काही मर्यादा असल्या तरी ज्याची टेस्ट पॉसिटिव्ह आली तर तो रुग्ण पॉसिटिव्हच असतो! त्यामुळे ताप आल्यास सद्यःस्थितीत प्रथम ह्या चाचण्यांना सामोरे गेले पाहिजे ! इतर रक्तचाचण्या जसे की एडठ, उठझ आणि लिम्फोसाइट काउंटही महत्वांचे असतात ! प्लेटलेट काउंट मात्र कोरोनात नॉर्मल असतो ! कोरोनाची लागण जर फुफ्फुसापर्यंत झाल्यास एक्स रे व सीटी स्कॅनची भूमिका निदानकामी महत्वाची असते !
कोरोना ही वैश्विक महामारी आहे. म्हणजे संपूर्ण जगातील अंदाजे 180 देशांमध्ये ह्याचा गेल्या सात महिन्यांपासून प्रादुर्भाव आढळून आला आहे. आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावागावांत व खेड्याखेड्यात कोरोना आता पोहोचला आहे. प्रत्येक जण कंटेनमेंट झोनच्या जवळील भागात राहत आहे. प्रत्येकाचा कोणीतरी मित्र, आप्त, नजीकच्या काळात कोरोना पॉसिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत कुठल्याही रुग्णास ताप आल्यास सर्वप्रथम कोरोनाचा विचार करूनच, कोरोनाची शक्यता आधी पडताळूनच इतर आजारांचा निदान व उपचार कामी विचार करावयास हवा !
ह्याचा अर्थ असाही नाही की, मलेरिया, टॉयफॉइड व डेंग्यूकडे दुर्लक्ष करावे कारण भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख नागरिक ह्यावरील आजारांनी प्रभावित होतात. आपणास आपले शरीर स्वस्थ व निरोगी ठेवायचे आहे, परंतु फक्त कोरोनापासूनच नाही तर इतर वरील आजारांपासूनसुद्धा. त्यामुळे कुठलाही प्रकारचा ताप आल्यास किंवा कुठल्याही प्रकारचा बदल शरीरात आढळून आल्यास सतर्क व सजग राहून, भीती न बाळगता नजीकच्या आरोग्य केंद्राकडे अथवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे धाव घेऊन सर्वप्रथम कोरोनाचे निदान करून त्याचा संसर्ग असल्यास उपचारास प्राधान्य दिले पाहिजे व अलगीकरण व विलगीकरण पाळले पाहिजे ! कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असेल तर डेंग्यू, टॉयफॉइड, मलेरिया अशा आजारांचा विचार केला पाहिजे ! लक्षात ठेवा, कोरोनाच्या आजारात जर पहिले 4 ते 6 दिवस दुर्लक्ष झाले तर मात्र कोरोना ह्या साध्या आजाराचे भयावह अशा गंभीर कोरोनात रूपांतर होऊ शकते व ज्या नागरिकांचे वय जास्त आहे व ज्यांना कोमोर बीडीटी (मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब, दमा, किडनी विकार, कर्करोगग्रस्त, अवयव प्रत्यारोपित व्यक्ती, कुपोषित व अतिस्थूल व्यक्ती) आहे अशांचा जीवही धोक्यात येऊ शकतो व उपचारासाठी प्रचंड धावपळ व खर्चही लागू शकतो ! म्हणून ताप आल्यास दुर्लक्ष करू नका, कोरोनाची चाचणी सर्वप्रथम करा. नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही !
चाहूल लागल्यास तापाची ,करा तपासणी करोनाची !!
डॉ. नरेंद्र ठाकुर,मो. 98231 37938