Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबालशहिदांचे बलिदान राष्ट्रीय एकात्मता चेतवणारे ठरो !

बालशहिदांचे बलिदान राष्ट्रीय एकात्मता चेतवणारे ठरो !

8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी दिलेल्या ‘चले जाओ’चा नारा दिला आहे. या नार्‍याला प्रतिसाद देत नंदुरबारातील बालशहिदांनी दि.9 सप्टेंबर 1942 ला मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर इंग्रज अधिकार्‍यांनी अमानुष गोळीबार केला. त्यात शिरीषकुमारसह शशिधर नीळकंठ केतकर, धनसुख गोरधनदास शाह, घनश्याम गुलाबचंद शहा, लालदास शहा ही पाच बालके शहीद झालीत. या घटनेला तब्बल 78 वर्षे पूर्ण झाली आहेत…

स्वातंत्र्यपूर्व काळातील ते मंतरलेले दिवस होते. ब्रिटिशांच्या अमानुष वागणुकीला सारेच कंटाळले होते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी शेकडो, हजारो देशभक्त प्रयत्नरत होते. सर्वच जण आपापल्या परिने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यास सज्ज होते. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला महात्मा गांधीजींनी चले जाओचा नारा दिला. त्यामुळे 9 ऑगस्टपासून क्रांतिकारी स्वातंत्र्य लढ्यास सुरुवात झाली. 1942 च्या प्रचंड क्रांतीसागराला जी भरती आली; त्यांच्या लाटा नंदुरबार शहरातील हल्लीच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या दाराशी येऊन आदळल्या.

- Advertisement -

या उसळत्या लाटांच्या प्रवाहामुळे लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भरती आली. ती उसळत राहिली. ‘करेंगे या मरेंगे’ हा क्रांतिमंत्र दुमदुमला. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात क्रांतीच्या प्रचंड लाटा आदळल्याने त्या संघर्षातून तेजःपुंज स्फुल्लिंग उगम पावली; ती शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल शहा, धनःश्याम शहा व शशिधर केतकर ही लोकमान्य टिळक विद्यालयाच्या उद्यानात उमलणारी कोमल फुले स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पित केली गेली. स्वातंत्र्याच्या होमकुंडास त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हौतात्म्य साधले.

8 ऑगस्ट 1942 ला ब्रिटिशांशी सुरू झालेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या संग्रामात रणशिंग फुकण्यात नंदुरबारातील बालसैनिक आघाडीवर होते. ‘करेंग या मरेंगे’ हा बिल्ला प्रत्येक भारतीयाने आपल्या खांद्यावर लावला पाहिजे. या गांधीजींच्या आदेशाला एक महिना पूर्ण झाला होता. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढण्याचे ठरविले. शहरातील रणछोड मंदिरावर एक एक जण जमू लागले. तेथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. जळका बाजाराजवळ इतर मुलेही या मिरवणुकीत सहभागी झाली. हळूहळू मिरवणुकीत शेकडो जण सहभागी झाले. त्यावेळी अमृत चौकात लवाद कोर्ट होते. तेथील इंग्रजांचा झेंडा काढून तिरंगा लावण्यात आला. तेथे सभा घेण्यात आली. त्यावेळी शेख नावाच्या फौजदाराने विरोध केला असता त्याला चाकू मारल्याने तो खाली पडला, त्यामुळे वातावरण तप्त झाले होते. त्यावेळी मामलेदार म्हणून गोसावी होते. त्यांनी मिरवणुकीवर फायरिंगचे आदेश दिले. तोपर्यंत मिरवणूक माणिक चौकात आली.

याठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती होती. कोवळ्या बालकांना पांगवण्यासाठी इंग्रज पोलीस हवेत गोळीबार करतील, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, पोलिसांनी सरळ मिरवणुकीवरच अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. गोळ्यांच्या धाडधाड आवाजाने सर्वत्र पळापळ झाली. जेवणाची वेळ असल्याने पोळ्याऐवजी गोळया खाव्या लागल्या. या अमानुष गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, घनशाम व शशिधर केतकर ही पाचही कोवळी बालके धारातिर्थी पडली. गोळ्यांचा प्रचंड कानठळ्या बसविणारा आवाज येत होता. यातील एक गोळी गोदामातील पोत्यातही आली. त्यात लालदास शहा गेला.

मात्र, त्यातील एक गोळी लालदासला लागली. लालदास त्यावेळी गोळी लागूनही जिवंत होता. तो कण्हत होता. मात्र, त्याला काही वेळ शिरीषकुमारच्या घरी व नंतर घरी आणण्यात आले. डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, छातीत गोळी असल्याने काहीही करणे शक्य नव्हते. त्यावेळी आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली असती तर बचावला असता. मात्र, दोन दिवसांनी तोही शहीद झाला. या सर्व शहिदांची अंत्ययात्रा लगेच काढण्यात आली.

सामुदायिक रितीने सर्व हुतात्म्यांची एकाचवेळी काढण्यात आलेली स्मशानयात्रा यापूर्वी स्मशानानेही कधी पाहिली नसेल किंवा पाहणारही नाही, अशी होती. अबालवृद्धांचा तो अपूर्व सोहळाचा होता. त्यांच्या पार्थिवांना एकाचवेळी अग्नीदाह देण्याचा तो अपूर्व देखावा होता. त्यानंतर सभा झाली. आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व हुतात्म्यांना आपल्या कुशीत सामावत असलेल्या अग्नीदेवतेच्या त्या उंच आकाशाकडे जाणार्‍या ज्वालांकडेच लागलेले होते. एक सळसळणारे चैतन्य व्यापक चैतन्याशी चैतन्यमय झाले. तरी त्यांची चैतन्यमय स्मृतीशलाका आपल्यातील धर्म, जाती, भाषा, भेद, प्रदेश भेदाच्या भिंतीचे जडत्व चाळून राष्ट्रीय एकात्मतेचे चैतन्य चेतवणारी ठरो, हीच आजच्या शहीद दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली ठरेल !

9 सप्टेंबर 1942 रोजी झालेल्या या घटनेला आज तब्बल 78 वर्षे झाली आहेत. ज्याठिकाणी ही घटना घडली, त्याठिकाणी शहिदांच्या नावाने स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक शहिदांच्या बलिदानाची आठवण करुन देतो.

– राकेश कलाल , नंदुरबार-मो.9552576284

- Advertisment -

ताज्या बातम्या