Friday, May 3, 2024
Homeनगरकेंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवावी - तनपुरे

केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवावी – तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

कांद्याच्या दरात थोडीफार वाढ होत असतानाच केंद्र शासनाने सुरळीत असलेल्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने

- Advertisement -

कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन त्वरित निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केली आहे.

तनपुरे म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षापासून दुष्काळ व मागील वर्षी झालेल्या अतिपावसामुळे यातून सर्व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकदा पिके वाया गेली तर शेतकर्‍यांना पुन्हा उभे राहण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी जातो. यावर्षी उन्हाळ कांद्याला थंडी व इतर हवामान अनुकूल नसल्याने उत्पादनात कमालीची घट आली आहे व उत्पादन खर्च मात्र वाढला आहे.

त्याचप्रमाणे काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजला. शेतकर्‍यांनी पावसाळी वातावरण पाहून कांदाचाळी घालण्यासाठी घाई करावी लागली. यादरम्यान मार्चमध्ये करोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व बाजारपेठ व शहरी वाहतूक बंद असल्याने कांद्याला ग्राहक नव्हता. चाळीतच ओला झालेला कांदा लवकर सडू लागल्याने शेतकर्‍यांना मिळेल त्या भावात कांदा विकावा लागला.

तर काही शेतकर्‍यांचा कांदा चाळीत सडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीन, खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे थोडाफार कांदा शिल्लक आहे, लॉकडाऊन शिथील झाल्याने कांद्याचे बाजारभाव बर्‍यापैकी उचल घेत असताना शेतकर्‍यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत होती.

केंद्र शासनाने कांद्यावर अचानक निर्यातबंदी लादली. शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता असून याबाबत शासनाने त्वरित निर्यातबंदी मागे घेऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कांदा उत्पादनाचा आज खर्च जवळपास 70 ते 80 हजार रुपये एकरी होत असून उत्पादनात प्रचंड घट आल्याने व खराब होण्याचे प्रमाण पाहता या दरातच शेतकर्‍यांना थोडेफार पैसे मिळवून सावरण्याची संधी मिळेल, याचा विचार केंद्र शासनाने सहानुभूतीपूर्वक करून लादलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या