सिन्नर | प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून डुबेरे परिसरातील शेतकरी, रहिवाशी बिबट्यांच्या दहशतीखाली वावरत असून शुक्रवारी (दि.18) रात्री 9 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नामदेव पावसे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले.
शेंद्री बंधारा ते वामनवाडी परिसरापर्यंत झाडीने व्यापलेला रस्ता असून या रस्त्याची अतिशय दैयनिय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यातून मार्ग काढत मोटारसायकलवर पावसे हे नेहमीप्रमाणे सिन्नरहून आपले काम आटोपून घराकडे जात होते. शेंद्री बंधार्याजवळ 9 वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्या त्यांच्या मोटारसायकलसमोर आला.
बिबट्याला बघून पावसे यांची त्रेधातिरपीट उडाली. ते जागेवर थबकले. बिबट्या त्यांच्या अंगावर झेपावणार तेवढ्यात त्यांनी जागेवरच मोटारसायकलचे एक्सलेटर पूर्णपणे पिळून धरले, दरम्यान मोटारसायकलचे एक्सलेटर पूर्ण दिल्याने मोटारसायकलचा मोठ्याने आवाज सुरु झाला व आवाज ऐकून बिबट्या गोटीराम वारुंगसे यांच्या मकाच्या शेतात पळाला.
घामाघूम झालेल्या पावसे यांनी वारुंगसे यांना आवाज देत बिबट्या शेतात शिरला असल्याचे सांगितले. गोटीराम यांच्यासह निवृत्ती कोंडाजी वारुंगसे, मिना निवृत्ती वारुंगसे पळतच घराबाहेर आले. त्यांनी मक्याच्या शेताजवळ फटाके फोडल्याने बिबट्याने आटकवडेच्या बाजूने धूम ठोकली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी दिनकर वामने यांच्या वासराला बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. तर भगवान वारुंगसे यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला आहे. मधुकर गंगाराम ढोली हे ट्रॅक्टरने शेताची नांगरणी करत असतांना त्यांनाही अगदी जवळून तीन बिबट्यांनी दर्शन दिले आहे. बिबट्यांच्या या मुक्त संचाराने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून एखादा अनूचित प्रकार घडण्यापूर्वीच वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.