गुवाहाटी | Guwahati
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर आज मंगळवारी (१२ मे) हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्री बनणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत. गुवाहाटी मध्ये पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हेमंत बिस्वा सरमा यांना शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
यावेळी रामेश्वर तेली यांनी भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री शपथ घेतली. हिमंत बिस्वा सरमा यांच्यासहित ४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो (बीपीएफ), अजंता नियोग यांचा समावेश आहे. आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा मतदारांनी सत्तास्थापनेसाठी कौल दिला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. आसाममध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. या निकालाने लोकांचा भाजपवर विश्वास असल्याचे दिसून आल्याचेही हिमंता यांनी सांगितले.
एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपालांनी रविवारी (१० मे) त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती. आसाममधील एनडीए सरकारचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी, २०१६ मध्ये सरबानंद सोनोवाल भाजपच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, तर २०२१ मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी पदभार स्वीकारला होता. हा शपथविधी सोहळा अत्यंत विशेष मानला गेला. हा शपथविधी सोहळा अत्यंत खास मानला गेला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशिवाय एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवास
हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आसाममध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपचे केवळ पाच आमदार होते. तथापि, हिमंता सरमा यांनी ईशान्य भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी धोरणात्मक काम केले. २०१६ मध्ये भाजपने त्यांची ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, त्यांनी ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
साल २००६ मध्ये त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली. १९९१-९२ मध्ये ते कॉटन कॉलेज विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते आणि नंतर ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ (AASU) शी जोडले गेले. १९९० च्या दशकात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २००१ मध्ये जालुकबारी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. विशेष बाब म्हणजे, ते या जागेवरून आतापर्यंत सलग निवडून येत आहेत.





