नंदन रहाणे
व्यवहारी जगात वावरतांना हळुहळु आपल्या असे लक्षात येते की, इथले बहुतेक संबंध औपचारीक असतात. भेटणे, बोलणे, बसणे, उठणे, हसणे, खेळणे… सार्याच कृतींमागे काही विवक्षित हेतू असतात; आणि ते बहुश: स्वार्थप्रेरित असल्याचे निष्पन्न होते! प्रत्येकाला दुसर्याकडून काहीना काहीतरी साधायचे असते. मनात विशिष्ट अपेक्षा धरुनच, जो तो आपापली व्युहरचना करीत असतो.. अशा जगरहाटीचा माणसाला शेवटी कंटाळा येतो. सखेसौंगडी तर सोडाच, नातेवाईकही जवळ नकोसे वाटू लागतात. किंबहुना या सार्यापासून आपणच दूर जावे अशी तीव्र भावना मनात दाटून येते. नि:स्वार्थ, निर्हेतुक, निरासक्त जगावे या इच्छेने उचल खाल्ली की मग माणूस पर्याय शोधु लागतो. ‘वारी’ हा त्यासाठी उत्तम मार्ग असल्याचे त्यांच्या लक्षात येते. ज्या मुक्त, स्वच्छंद जगण्याचा त्याला ध्यास लागलेला असतो. ते तसे जगायला मिळते पंढरीच्या वारीत!
खरे तर ‘वारी’ निर्हेतूक नसते आणि स्वच्छंदही नसते. पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेणे हा तिचा हेतू असतो आणि विशिष्ट दिवसांत तेवढे अंतर पायी चालत जायचेच अशी शिस्तही असते. थबकणे, रेंगाळणे, भरकटणे या बाबींना वारीच्या प्रवासात स्थानच नसते. तरीही, वारी माणसांना जो मोकळेपणा हवा असतो. जी अनौपचारिकता हवी असते. जे निरागस जगणे हवे असते… ते सारे देतेच देते! नात्यातले ना गोतातले, जातीतले ना पातीतले असे हजारो अनोळखी भाविक एका दिशेने अनेक आठवडे चालतात आणि हरिभक्तीचा सोहळा भोगून, हवे ते मिळाल्याचा तुडूंब आनंद सोबत घेऊन परत फिरतात… नामदेवरायांनी सुरु केलेल्या वारीची हिच गंमत ज्ञानोबारायांनाही अनुभवता आली आणि त्यांनी ती लिहूनही ठेवली –
पूर्वजन्मी सुकृतें थोर केली ।
ती मज आजि फळासी
आली ॥1॥
परमानंदु बहुत मानसी ।
भेटी जाली या संतांशी ॥2॥
माय बाप बंधु सखे सोयरे ।
याते भेटावया
मन न धरे ॥3॥
एक एका तीर्थाहुनी आगळे ।
तयांमाजी परब्रह्म
सावळे ॥4॥
वत्स विघडलिया धेनु भेटली ।
जैसी कुरंगिणी
पाडसा मीनली ॥5॥
हे पियूषापरते गोड वाटत ।
भक्त पंढरिरायाचे भेटत ॥6॥
बापरखुमादेवीवर विठ्ठले ।
संत भेटता
भवदु:ख फिटले ॥7॥
ज्ञानदेवादि भावंडाचे अवघे आयुष्यच तिरस्कार, हेटाळणी, छळवणूक यांनी भरलेले होते. ‘संन्याशाची पोरे’ म्हणून जन्मल्यापासूनच त्यांच्या वाट्याला सतत अपमानच आला. शिव्या, कुचेष्टा यांचा मारा झेलतच ही मुले लहानाची मोठी झाली. पैठणचा रेड्याचा प्रसंग व नेवाश्याचे ज्ञानेश्वरी लेखन झाल्यावर त्यांना समाजाकडून मान व आदर मिळू लागला. पण, खरे प्रेम आणि जिव्हाळा यांचा अनुभव, त्यांना नामदेवराय अन् त्यांच्या संतमंडळाकडूनच मिळाला. मायबाप गेल्याचे, नातेवाईक दुरावल्याचे दु:खही ज्ञानदेव विसरले आणि म्हणू लागले की, मागील जन्मी जी चांगली कर्मे केली, ती आज फळाला आली व त्यामुळेच या सर्व संतांची इथे अशी भेट झाली. त्याचा आनंद मी सांगू बरे! हे सगळे संतसखे एकाहुन एक पवित्र महापवित्र आहेत आणि साक्षात सावळे परब्रह्यही त्यांच्या मेळाव्यातच नांदते आहे…
चुकलेल्या वासराला गाय भेटावी किंवा हरवलेल्या पाडसाला हरिणी दिसावी म्हणजे कसे वाटेल – अगदी तसा आनंद मला इथे मिळतोय. अहो, हे पंढरीरायाचे भक्त भेटले की अमृतसुध्दा फिके वाटते, इतकी यांच्या सहवासाची गोडी आहे! हे सगळे संत भेटले मला आणि मग, माझ्या मनात आजवर मी जे भोगलेले दु:ख साठून राहिले होते ते अवघे ओसरुन गेले की हो! वारीला जाणारे जे वारकरी असतात त्यांच्याच भावना ज्ञानेश्वर महराजांनी या अभंगातून व्यक्त केल्या आहेत. वारीची ओढ लागते ती प्रेम, जिव्हाळ्यामुळेच!




