Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshadhi Ekadashi 2025: पांडुरंगाची श्रद्धा आणि निरपेक्ष सेवा कधी वाया जात नाही...

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाची श्रद्धा आणि निरपेक्ष सेवा कधी वाया जात नाही – मानाचे वारकरी उगले

नांदगाव | संजय मोरे | Nandgaon

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूर (Pandharpur) येथील श्रीविठ्ठल मंदिरात (Vitthal Temple) देशभरातील सर्व वारकरी बांधवांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व अमृता फडणवीस यांच्या हस्ते केल्या जाणाऱ्या शासकीय महापूजेसाठी वारकरी संप्रदायातील मानाचा असणारा बहुमान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील (Nandagon Taluka) जातेगाव येथील भूमिपुत्र तथा वारकरी कैलास दामु उगले व कल्पना कैलास उगले यांना मिळाल्याने गावासह तालुका परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी लाखो भाविक विठूरायाच्या (Vithuraya) दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेले असताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव येथील कैलास दामु उगले (Kailas Ugale) व व त्यांच्या पत्नी कल्पना कैलास उगले यांना वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा व भक्तीभावाने वारकरी संप्रदायात मानाचे स्थान मिळाले आहे. जातेगाव येथील कैलास दामु उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी असून ते गेल्या १३ ते १४ वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आले आहेत. भक्ती व निरपेक्ष सेवाभावामुळेच वारकरी संप्रदायात मानाचे वारकरी म्हणून मंदिर समितीकडून त्यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, उगले दाम्पत्याला यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने गावासह नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) गौरवाचा हा आध्यात्मिक क्षण ठरला आहे. कारण शासकीय महापूजेमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहभागी होण्याची संधी उगले कुटुंबाला (Ugale Family) मिळाली आहे. याप्रसंगी उगले दाम्पत्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभर मोफत प्रवासासाठी पास प्रदान करण्यात आला आणि मंदिर समितीकडूनही विशेष सन्मानित करण्यात आले.

सर्वसामान्य जीवन अन् मिळाला निरपेक्ष भगवंत

सर्वसामान्य शेतकरी असूनही वारकरी संप्रदाय परंपरेला वाहून घेतलेल्या उगले दाम्पत्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी भक्तीच्या वाटचालीस प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. ग्रामीण भागात साधे जीवन जगत असतानाही, त्यांच्या निष्ठेने त्यांना विठूरायाच्या सान्निध्यात निरपेक्ष भक्तीमुळे हा सन्मान मिळाल्याने जिल्ह्यासह राज्यभरात उगले दाम्पत्याचे कौतुक केले जात आहे. उगले दाम्पत्य हे शासकीय महापूजेचा मान मिळालेले नाशिक जिल्ह्यातील तिसरे कुटुंबीय ठरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुर्मिळ भागातील आम्ही सर्वसामान्य शेतकरी असून, आम्हा दोघांना मिळालेला हा मान जणू नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण वारकऱ्यांना लाभलेला सन्मान आहे. पांडुरंगाची श्रद्धा आणि निरपेक्ष सेवा कधी वाया जात नाही. पांडुरंगाच्या चरणी सेवा आणि सन्मान मिळण्याचा हा क्षण अविस्मरणीय असून, जीवन सार्थ झाले आहे.

कैलास दामू उगले, आषाढी एकादशीचे मानाचे वारकरी

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...