शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थांकडून खात्यांची माहिती मागवली होती. या दोन्ही बँकेत जवळपास 60 कोटींची उलाढाल झाली असल्याचे निदर्शनास आले असून अशोक खरात याची बायको कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकाऊट नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली.

या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांच्या लक्षात आले की या व्यवहारांमध्ये समता व जगदंबा पतसंस्थेची नावे येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली त्यात राहाता येथील समता पतसंस्थेत 57 खातेधारकांची सुमारे 100 खाती उघडण्यात आल्याचे आढळले. या खात्यांना नॉमिनी म्हणून अशोककुमार एकनाथ खरात (राहणार नाशिक) यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून सुमारे 60 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती असून सध्या सुमारे 78 लाख 99 हजार रुपये शिल्लक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या खात्यांमध्ये खरात कुटुंबीयांची काही खाती तसेच प्रकरणातील इतर आरोपींशी संबंधित खातीही असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतांश खात्यांसाठी एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर झाल्याचेही लक्षात आले आहे.
तसेच सिन्नर येथील जगदंबा नागरी पतसंस्था सिन्नर एकुण 32 खातेदारांची खाती उघडण्यात आली असून त्यावर पावणेतीन कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे. सदर तपासात वरील प्रमाणे माहीती उघड झाली आहे. पोलीस अधिक तपास करत असून खातेदारांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे पोलीस आणखीही खाती शोधणार आहे तसेच अन्य बँकांमध्येही चौकशी करण्यात येणार आहे अशोक खरात याची बायको कल्पना प्रदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी देशातील सर्व विमानतळावर लुकाऊट नोटीस जारी केली असल्याची पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यावेळी सांगितले.
ती खाती कायदेशीर : कोयटे
समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेऊन सर्व खाती कायदेशीर होती. यातील व्यवहारही सर्व कायदेशीर झाले आहेत. सर्व खाती शासन नियमानुसार केवायसी केलेली आहेत. समता पतसंस्थेत तशी खातीच उघडली जात नाहीत. अनेक खात्यांना एकच नॉमिनी असणे बेकायदेशीर नाही. समता पतसंस्थेकडे जवळपास एक लाख दहा हजार खाते आहेत. त्यामुळे काही खात्यांना एकच नॉमिनी लागले असेल तर ते लक्षात येत नाही. पोलिसांच्या मागण्यांवरून ही सगळी खाती दिली आहेत. ही सर्व खाती नियमित व कायदेशीर आहेत असा दावा कोयटे यांनी केला. ही सर्व खाती मे 2021 ते जानेवारी 2026 पर्यंत सुरू होते. त्यानंतर यातील रकमा काढून घेण्यात आल्या. अशोक खरात व परिवाराचे सध्या बँकेत तीस लाख रुपये जवळपास बॅलन्स आहेत. अन्य बहुतेक खाती रिकामी झाली आहेत. सर्व खाती पोलिसांच्या सूचनेनुसार गोठवली आहेत असे त्यांनी सांगितले.




