मुंबई । Mumbai
भोंदूगिरीच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेला नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणामुळे केवळ आध्यात्मिक क्षेत्रच नाही, तर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट राज्याच्या सत्तासंघर्षापर्यंत आणि जादूटोण्यासारख्या धक्कादायक प्रकारांपर्यंत पोहोचले आहेत.
अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप खरातवर आहे. आरोपी हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून, मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर त्याने स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रस्थापित केले होते. त्याच्या आश्रमात अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता आता त्याला गंभीर राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भोंदू बाबाचे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाशी जोडले आहे. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, खरातचे व्हिसीआर (VCR) मालकाशी जवळचे संबंध असून, त्यांनी खरात आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे सीडीआर (CDR) तपासण्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या ‘सहयोग’ सोसायटीतील निवासस्थानाबाहेर आणि ‘देवगिरी’ बंगल्याबाहेर या भोंदू बाबाच्या माध्यमातून जादूटोणा करण्यात आल्याचा खळबळजनक संशयही व्यक्त केला जात आहे.
याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.
नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांना काळजी घेण्याचे आवाहन करत सध्याचे राजकारण बेभरवशाचे झाले असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या आहेत. अशोक खरात याच्या पाद्यपूजेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये चाकणकर खरातची पूजा करताना दिसत आहेत. एका बाजूला महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षाच अशा भोंदू बाबाच्या संपर्कात कशा, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर आता पोलीस त्याच्या संपर्कात असलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींची आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक वास्तव समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





