Tuesday, April 28, 2026
Homeराजकीयरूपाली चाकणकर यांच्या विरोधात अंजली दमानिया मैदानात, राजीनाम्याची मागणी

रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अंजली दमानिया मैदानात, राजीनाम्याची मागणी

मुंबई । Mumbai

कथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही नवे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, दमानिया यांनी चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या तातडीच्या राजीनाम्याची आणि हकालपट्टीची मागणी केली आहे. या ‘भोंदू बाबा’ला नेमके कोणाचे अभय होते, असा थेट सवालही त्यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.

- Advertisement -

अशोक खरात विरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने गंभीर तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेला गुंगीकारक औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप खरातवर ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास खरातला बेड्या ठोकल्या. आरोपी खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, तो सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, मात्र आता त्याच्या या काळ्या कतृत्वामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी सध्या नाशिकमध्ये दाखल झाले असून, तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने हा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या उच्चस्तरीय तपासामुळे अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत.

तपासाच्या पुढील टप्प्यात खरातच्या अफाट संपत्तीचे रहस्य आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतर प्रभावशाली व्यक्तींचे धागेदोरे उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चाकणकर यांच्यासोबतचे फोटो समोर आल्याने आता महिला आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपी खरातने आपल्या रसूखाचा वापर करून किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा शोध आता एसआयटी घेणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सरकारवरही कारवाईसाठी दबाव वाढत आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...