शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
अशोक खरात (Ashok Kharat) यांच्याशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक निलेश जपे यांच्या हॉटेल मारीगोल्ड (Hotel Marigold) तसेच कोपरगाव येथील निवासस्थानी एकाचवेळी छापेमारी (Raid) केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शिर्डी (Shirdi) परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीचे पथक (ED Team) हॉटेलमध्ये दाखल झाले तर दुसर्या पथकाने कोपरगाव (Kopargan) येथील निवासस्थानी तपासणी सुरू केली. अनेक तासांपासून जपे यांची चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, बँक नोंदी आणि डिजिटल माहितीची पडताळणी करण्यात येत आहे. निलेश जपे हे साई पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक असल्याचे समजते. या कंपनीमार्फत संशयित व्यवहार झाले होते का, याचा तपास सुरू असल्याची चर्चा आहे. अशोक खरात (Ashok Kharat) यांच्याशी संबंधित निधीची उलाढाल आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने जपे यांचे नाव तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खरात आणि जपे यांच्यातील संबंध नेमके कोणत्या स्वरूपाचे होते, याबाबत विविध तर्क व्यक्त होत असले तरी ईडीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या तपासातून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील अशोक खरात संबंधित प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विविध आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि इतर गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. या संदर्भात काही आर्थिक संस्थांमधील संशयित व्यवहार आणि मोठ्या प्रमाणावर निधीची उलाढाल तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून समजते.
गुरुवारी करण्यात आलेल्या छाप्यात (Raid) संबंधित हॉटेलमधील आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि व्यवहारांची साखळी तपासण्यात येत असल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर काही व्यावसायिक, अधिकारी आणि इतर व्यक्तींमधील कथित आर्थिक संबंधांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भातील कोणतीही माहिती अधिकृत तपासातून सिद्ध होणे आवश्यक असून, तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणात एसआयटी (SIT) तसेच स्थानिक पोलीस यंत्रणा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. संबंधित प्रकरणात पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील काही आठवड्यांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी पडताळणी केली जाणार आहे. अशोक खरात याला अटक होण्यापूर्वी याच हॉटेलवर तीन बड्या अधिकार्यांनी बैठक घेतली असल्याची चर्चा आहे . हॉटेलचा मालक निलेश जपे हे तिरुपती बालाजी ट्रस्टवर (Tirupati Balaji Trust) सदस्य असून यामागे अशोक खरात याचा हात असल्याचे बोलले जात आहे.




