भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जशी आवक होत आहे. त्याप्रमाणात प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गही वाढविण्यात येणार आहे.
निळवंडे धरणात 8324 दलघफू पाणी असून 2357 क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. वाकी तलावातही आवक होत असल्याने या तलावातून 197 क्युसेकने पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे. काल सकाळपर्यंत नोंदविला गेलेला पाऊस असा (मिमी)- भंडारदरा 21, निळवंडे 11, रतनवाडी 20, घाटघर 31, वाकी 18.
मुळा पाणलोटातही पाऊस सुरू
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही शनिवारपासून हलकासा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मुळा नदीतील विसर्ग काहीसा वाढला आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणांत 23049 दलघफू (88.65 टक्के) साठा असून कोतूळ येथे मुळा नदीचा 625 क्युसेक होता.
आजपासून भंडारदरातून खरीपाचे आवर्तन
राहाता |प्रतिनिधी| Rahata
भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून खरीपाचे आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. लाभक्षेत्रात यंदाच्या वर्षी सरासरीइतका पाऊस न झाल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेती पिकांसाठी तसेच काही गावांमधील पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकर्यांनी जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याकडे केली होती.
या संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीतही प्रामुख्याने खरीप पिकांना जीवदान मिळावे म्हणून आवर्तनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. धरणातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्र्यांनी सोमवार 14 सप्टेंबर पासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंपदा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील खरीप पिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.




