अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाची अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी पूर्ण झाली असून, आज, सोमवारी घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तब्बल 12 दिवस चालणार्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी आकर्षक मंडप उभारून चौकांची सजावट, विद्युत रोषणाई आणि कमानी उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचला असला, तरी दुसरीकडे दुष्काळ आणि महागाईचे सावटही उत्सवावर जाणवत आहे.
दरम्यान, अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात सकाळी 9.30 वाजता उत्सवमूर्तीची जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा लहान-मोठ्या दोन हजार 959 गणेश मंडळांची स्थापना होणार आहे. याशिवाय 98 खासगी तर 255 ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ असणार आहे.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला रविवारी नगरकरांनी कुटुंबासह गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. परंपरेनुसार घरातील गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी एक दिवस आधी घरी आणण्याची लगबग नागरिकांमध्ये दिसून आली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी दिवसभर मोठी वर्दळ होती. यंदा गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणार्या साहित्याच्या किमतीत सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम मूर्तींच्या किमतीवर झाला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सजावटीच्या साहित्यानेही बाजारपेठा फुलल्या आहेत. रविवारी सुट्टी असल्याने नागरिकांनी सहकुटुंब बाजारपेठेत येऊन गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य तसेच सजावटीचे साहित्य खरेदी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळांनीही जोरदार तयारी केली आहे. विविध मंडळांनी मंडप उभारून चौक सुशोभित केले असून, आकर्षक कमानी आणि विद्युत रोषणाईची तयारी पूर्ण केली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी तरूण मंडळांचे कार्यकर्ते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
डीजे-डॉल्बीला बंदी
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात डीजे आणि उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत 14 ते 25 सप्टेंबर तसेच नवरात्रोत्सवात 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ही बंदी लागू राहणार आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी याबाबत आदेश काढले आहेत. डॉल्बी आणि उच्च आवाजामुळे वृध्द, रूग्ण, गर्भवती महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
492 जण तडीपार
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. शहर उपविभागात 492 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच 383 जणांकडून शांतता राखण्यासाठी बंधपत्र घेण्यात आले असून, दारू विक्री करणार्या 21 जणांकडून शपथपत्र घेण्यात आले आहे. चार जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेतल्या असून, तरूण मंडळे, धर्मगुरू, वाद्य वाजविणारे, मूर्तिकार आणि फलक तयार करणार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेर्यांव्दारे देखरेख सुरू आहे. दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.




