Monday, September 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १४ सप्टेंबर २०२६ - श्री विघ्नहर्त्याच्या आगमनाचा संदेश

संपादकीय : १४ सप्टेंबर २०२६ – श्री विघ्नहर्त्याच्या आगमनाचा संदेश

आज विघ्नहर्ता आणि बुद्धिदेवता श्री गणेशाचे मंगलमय आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनाने घराघरांत उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशांचा निनाद, आरास, सजावट आणि आरतीच्या स्वरांनी परिसर दुमदुमून जात आहे. मात्र, गणेशोत्सव हा केवळ उत्सव साजरा करण्याचा काळ नाही; तो आत्मपरीक्षणाचा आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा काळ आहे. त्या अर्थाने हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक उत्थानाचा मानला पाहिजे. या उत्सवाचे स्वरूप आणि महात्म्य पाहता तशी अपेक्षा करणेही गैर ठरू नये. विघ्नहर्त्याची पूजा करताना समाजासमोरील विघ्ने दूर करण्यासाठी आपण काय करणार, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकर्‍यांसमोर आज अनेक संकटे उभी आहेत.

- Advertisement -

अनियमित पाऊस, अतिवृष्टी, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ-उतार आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकर्‍याचे जीवन अस्थिर झाले आहे. शेतात राबणार्‍या अन्नदात्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे ही सामाजिक न्यायाची गरज आहे. गणरायाकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करताना शेतकर्‍याच्या घामाला योग्य मूल्य मिळावे यासाठी समाजाने आणि शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकरी सक्षम झाला तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. दुसरीकडे, देशाचे भविष्य घडविणारा विद्यार्थीवर्ग संकटाचा सामना करत आहे. भविष्याचा पाया असणारी शिक्षणव्यवस्था आणि वारंवार समोर येणारा पेपरफुटीचा मुद्दा तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसणारा ठरत आहे. कष्टाने अभ्यास करणार्‍या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे प्रकार घडत असल्याने, या भ्रष्ट यंत्रणेविरोधात विद्यार्थी आज राज्यभर रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा हा रोष न्याय्य असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी आजचा तरुण करत आहे.

याशिवाय, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर मोठा ताण असून करिअरची चिंता आणि रोजगाराची अनिश्चितता यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर समस्यांकडे तर्कशुद्धपणे पाहण्याची क्षमता निर्माण करणे होय. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांसोबतच, उत्सवकाळात संस्कृतीच्या नावाखाली चाललेला धिंगाणा आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव म्हणजेच डीजेचा दणदणाट नको, या भूमिकेवरून समाजात उठलेले काहूर विचार करायला लावणारे आहे. एका बाजूला लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे डीजेच्या उच्चांकी डेसिबलमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण आणि त्याविरोधात प्रशासनाच्या भूमिकेवर उठलेले राजकीय व सामाजिक काहूर दुर्दैवी आहे. डीजे नको, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाप्पाचे स्वागत करणे यातच खरी महाराष्ट्राची संस्कृती सामावलेली आहे. वृद्ध, रुग्ण व बालकांच्या आरोग्याचा विचार करून पर्यावरणपूरक व शांततापूर्ण उत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे.

या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण आणि राजकीय मंडळी यांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. लोकशाहीमध्ये सत्तेचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर जनकल्याणासाठी व्हायला हवा. आज राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि व्यक्तिगत टीका यांना प्राधान्य दिले जाते. अशावेळी गणेशाच्या बुद्धीचे स्मरण करून, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे विधायक राजकारण हीच खरी लोकसेवा ठरेल. गणेशोत्सवाने समाजाला एकत्र आणण्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात दिखाऊपणापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देऊया. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, स्वच्छता, रक्तदान, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी जनजागृती अशा उपक्रमांतून उत्सवाला विधायक दिशा देता येईल. विघ्नहर्ता आपल्या जीवनातील अडथळे दूर करो, अशी आपण मनोभावे प्रार्थना करतो; परंतु समाजातील विघ्ने दूर करण्याची जबाबदारी केवळ देवावर सोपवून चालणार नाही. शेतकर्‍याला न्याय, राजकारणाला विवेक, शिक्षणव्यवस्थेची शुद्धता आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, तरच समृद्ध आणि सक्षम भारताची वाट सुकर होईल. भक्तीसोबत बुद्धी, श्रद्धेसोबत कर्तव्य आणि उत्सवासोबत सामाजिक जबाबदारी हाच गणरायाच्या आगमनाचा खरा संदेश.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...