नाशिक | Nashik
महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्य संशयित आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या तपासात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी (SIT) पथकाकडून खरातची कसून चौकशी सुरू असून, त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविवारी (दि.२९) रोजी नाशिक सत्र न्यायालयाने खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी उद्या (दि.०१) रोजी संपणार आहे. त्यामुळे न्यायालयात नेण्यापूर्वी खरातविरोधात अधिक जास्त पुरावे एसआयटीकडून गोळा केले जात आहेत. अशातच आता खरातने एकही महिला गर्भवती होऊ नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याचा संशय एसआयटी आणि पोलिसांना आहे. यामुळे आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना (Women) गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच महिलांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्यांना संमोहित करण्यासाठी देखील काही विशिष्ट औषधांचा वापर केला जात होता का? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रतिबंधित औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला? आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत? यावर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याप्रकरणात एसआयटीकडून उद्या (बुधवारी) न्यायालयात गंभीर बाब समोर उघडी केली जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : ‘क्राइम सीन’ रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT ला काय-काय मिळालं?
दरम्यान, आज (मंगळवारी) खरातच्या एसआयटी चौकशीचा १३ वा दिवस असून, त्याची सकाळपासून कसून चौकशी सुरु आहे. रविवारी एसआयटी आणि पोलिसांनी न्यायालयात खरात चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगितले होते. महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा विषय निघाल्यावर खरात उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या चौकशीत काय समोर येते हे बघणं महत्त्वाचे असणार आहे. तसेच उद्या जर न्यायालयात या गुन्ह्यात डॉक्टरांचे संगनमत असल्याचे निष्पन्न झाले तर नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रातील काही मोठी नावे या प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर





