राहाता |प्रतिनिधी| Rahata
श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणार्या शिर्डीच्या पावन भूमीत माणुसकीला काळिमा फासणारी आणि गुन्हेगारी जगतालाही हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या शब्दावर विसंबून राहणार्या आणि संकटात आधार मानणार्या श्रीमंत भक्तांना लुबाडण्यासाठी अशोक खरात नावाच्या एका भोंदू बाबाने चक्क बॉलिवूडच्या स्पेशल 26 चित्रपटाची आठवण करून देणारा अजब कट रचला. बनावट इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून स्वतःच्याच भक्तांच्या घरी धाडी टाकणे आणि नंतर सेटिंगच्या नावाखाली कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा खरातचा हा खळबळजनक कारनामा आता चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्याकडे अनेक बडे उद्योजक आणि व्यावसायिक श्रद्धेपोटी येत असत. या भक्तांच्या घराची खडा न् खडा माहिती आणि त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा खरातला ठाऊक होता. याच माहितीचा गैरफायदा घेत खरातने आपल्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांना इन्कम टॅक्स अधिकारी बनवून या उद्योजकांच्या कार्यालयांवर पाठवले. अचानक पडलेल्या या धाडीमुळे घाबरलेले उद्योजक मदतीसाठी जेव्हा आपल्या या ‘गुरू’कडे धाव घेत, तेव्हा खरात मोठ्या चालाखीने मध्यस्थीचे नाटक करत असे. मी वरच्या पातळीवर ओळख काढून प्रकरण रफादफा करतो, असे सांगून तो भीतीपोटी व्याकुळ झालेल्या भक्तांकडून कोट्यवधी रुपये उकळत असे.
थोडक्यात सांगायचे तर भीतीही स्वतःच घालायची आणि तारणहार बनून समोरही स्वतःच यायचे, असा हा दुहेरी आणि क्रूर खेळ शिर्डी परिसरात सुरू होता. या बनावट धाडींच्या सत्रामुळे अनेक नामांकित उद्योजक खरातच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी या भोंदू बाबाच्या हवाली केली.
सध्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात वार्यासारखी पसरली असून खरातने किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे, याचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र समाजात आपली बदनामी होईल किंवा या प्रकरणाचा गुंता वाढेल, या भीतीने अनेक फसवणूक झालेले उद्योजक अद्याप तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाहीत.
भक्तीच्या नावाखाली चालणार्या या संघटित गुन्हेगारीने पोलीस प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे केले असून आता या हायप्रोफाईल गुन्हेगारावर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




