सातारा | Satara
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा राबवणार असून ठाकरे गटाच्या आठ खासदारांना गळाला लावणार असल्याच्या चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी या बातम्या खोट्या असून शिंदे गटावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरणावर भाष्य केले आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर, दोन खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते, असे सांगितले गेले. यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले. अशी कोणतीही बैठक झाली नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच या सगळ्या अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शिवसेना गटाचे खासदार फुटून शिवसेनेत (शिंदे गट) येणार असल्याच्या चर्चा आणि कथित गुप्त बैठकीच्या बातम्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार खंडन केले आहे. “उबाठाच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि खोडसाळ आहे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका मांडली आहे.
अशी कोणतीही बैठक झालेली नाही
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “गेल्या दीड वर्षांपासून उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि ती केवळ अफवा असल्याचेही त्यांनी म्हटले.
अरविंद सावंत काय म्हणाले?
अरविंद सावंत यांनी हे वृत्त खोडसाळ असून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले. येत्या २४ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाची सुनावणी आहे. त्याआधीच हे वृत्त येणे योगायोग नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत सावंत यांनी तसे एका कागदावरही लिहून दिले.





