नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
देशातील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातील आसाम, केरळ व पुदुच्चेरी या राज्यांसाठी ९ एप्रिल रोजीच एका टप्प्यात मतदान पार पडले. त्यानंतर आज (दि.२३ एप्रिल) रोजी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी तर संपूर्ण तामिळनाडूमध्ये मतदान पार पडत आहे. दरम्यान या पाचही राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होणार आहे.
दक्षिण भारतातील पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ही दोन राज्य राजकीयदृष्ट्या सत्ताधारी भाजपासाठी महत्त्वाची मानली जातात. या दोन राज्यांमध्ये भाजपाला पाहिजे तसे यश मिळालेले नाही. या राज्यांत स्थानिक पक्षांचाच कायम वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे या दोन राज्यांतील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांपैकी आज पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील विधानसभेच्या १५२ जागांसाठी मतदान होत आहे. या १६ जिल्ह्यांत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, मुर्शिदाबादसारख्या एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात बहुरंगी लढतींचे चित्र आहे.
हे देखील वाचा : Baramati-Rahuri By Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अक्षय कर्डिले यांनी बजावला मतदानाचा हक्क; सकाळच्या सत्रात किती टक्के मतदान?
दुसरीकडे तामिळनाडूमध्ये एकूण २३४ विधानसभा जागा आहेत. त्यापैकी कोलाथुर (एम. के. स्टालिन), डॉ. राधाकृष्णन नगर, मदुरवोयल आणि अंबत्तूर या प्रमुख जागा आहेत. या जागा चेन्नईच्या शहरी भागांचे आणि महत्त्वाच्या राजकीय बालेकिल्ल्यांचे प्रतिनिधित्व करतात. येथील मुख्य राजकीय लढत प्रामुख्याने द्रविड मुन्नेत्र कझगम (DMK) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (AIADMK) यांच्यात आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये आतापर्यंत किती टक्के मतदान?
निवडणूक आयोगाने सकाळी ९ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार बंगालमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १८.७६ टक्के मतदान झाले होते. यात पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात सर्वाधिक २०.५१ टक्के तसेच मालदा जिल्ह्यात सर्वात कमी १६.९६ टक्के मतदान झाले होते. तर तामिळनाडूमध्ये हा आकडा १७.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत तामिळनाडूमध्ये ५६.८१ टक्के मतदान झाले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान झाले आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये राडा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठा राडा झाला. आम जनत उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायू कबीर आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. त्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नवादा भागात मतदान सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी देसी बॉम्ब फेकले. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञाताने फेकलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले.
मतदारांच्या मतदानासाठी रांगा
पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडीपासून ते दक्षिणेतील मुर्शिदाबाद, नदिया, बीरभूम आणि हुगळीपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांच्या लांब रांगा लागल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. बीरभूम, पश्चिम वर्धमानमध्ये तृणमूलचे प्राबल्य दिसते. बांकुडा, पुरुलिया, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर या जिल्ह्यांत भाजप आणि तृणमूल यांच्यात चुरशीची लढत आहे. तर, २२ जागा असलेल्या मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष मजबूत असल्याने येथे बहुरंगी लढतींचा अंदाज आहे.
मागील निवडणुकीत आकडेवारी कशी होती?
मागील विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२१) तृणमूलला २१३ जागा मिळाल्या होत्या. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २९ जागा मिळवून पक्षाने यश टिकवून ठेवले. सन २०१६ मध्ये केवळ तीन जागा मिळवलेल्या भाजपने २०२१ मध्ये ७७ जागांवर मुसंडी मारली. त्याआधी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १२ जागांवरच यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपने जोर लावला आहे. भाजपने ‘एसआयआर’चा मुद्दा घेऊन बांगलादेशी घुसखोरीवरून वातावरण तापवले. ‘एसआयआर’मध्ये सुमारे ११ टक्के नावे वगळली आहेत. पहिल्या टप्प्यातील मुर्शिदाबाद, मालदा, पश्चिम वर्धमान, दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणातील नावांचा त्यात समावेश आहे.
महिला मतदारांमध्ये घट
पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’मुळे महिला मतदारांची संख्या घसरली आहे. पहिल्या टप्प्यात १.८४ कोटी पुरुष, तर १.७५ कोटी महिला मतदार आहेत. ‘एसआयआर’आधी राज्यात दरहजारी पुरुष मतदारांमागे महिला मतदारांचे प्रमाण ९७० होते. ‘एसआयआर’नंतर पहिल्या टप्प्यातील १५२ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण दरहजारी पुरूष मतदारांमागे ९५० इतके झाले आहे.





