मुंबई | Mumbai
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Ajit Pawar and Shivajirao Kardile) यांच्या निधनानंतर रिक्त झालेली अनुक्रमे बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२३ एप्रिल) रोजी मतदान (Voting) पार पडत आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ असून, सकाळच्या सत्रात उमेदवारांसह काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांनी बारामतीमधील काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे (Govind Mokate) यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह एकूण ७ उमेदवार निवडणूकीच्या (Election) रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीनेदेखील संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे.
मतदानानंतर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की, “सगळ्याच बाजूने ही अत्यंत भावनिक निवडणूक आहे. अजित दादांशिवाय कोणत्याही गोष्टी करण्याची सवय आपल्याला नाही. पण आज आपण हे मानून चालायला हवं की दादा आता आपल्यात नाहीत. सगळ्याच बारामतीकरांनी हे लक्षात घेतलं आहे आणि ते मतदानाला बाहेर पडत आहेत. बारामतीची जनता आज कर्तव्य म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडताना दिसत आहे. बारामतीची जनता आजचे मतदान अजितदादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्षं केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहे”, असे त्यांनी सांगितले.
अक्षय कर्डिले काय म्हणाले?
मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना भाजप उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की, “मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दुःख देखील आहे. शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या निवडणुकीत हे मतदान करण्याची वेळ प्रत्येकावर आली याचे त्यांना दुःख आहे. पण आज या वेळेला आम्हाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येकाच्या मनातल्या भावना मतांच्या रुपात व्यक्त होणार आहेत. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावना मतांमधून व्यक्त करत मला संधी देणार आहेत. या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे. ही निवडणूक मी कधीही विसरू शकणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पोटनिवडणूक कुठल्याचं कुटुंबासाठी आनंदाची नसते, मलाही आज मतदान करताना विश्वास बसत नव्हता की आपण आज दादाला मतदान करत नाही. सतत अनेक वर्ष कुठल्याही घरात कुठलाही करता पुरुष हा अशा पद्धतीने गेला, तर ते दुःख त्याच्यातून बाहेर पडणे असत तेच असतं. त्याला जाऊन दोन-तीन महिने पण झालेले नाहीत पोटनिवडणूक लागलेली ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आम्ही आलेला आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून एक कर्तव्य म्हणून केला पाहिजे. त्यामुळे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणून मतदान करायला यावे”, असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले.
बारामतीमध्ये पहिल्या दोन तासांत केवळ ८ टक्के मतदान
बारामती पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दोन तासांत अवघ्या ८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन तासांमध्ये ३० हजार ७९८ मतदारांनी मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार आहेत. दुसरीकडे राहुरीत साडे अकरा वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले आहे.





