– राजेंद्र पाटील
करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने शेवटच्या टप्प्यात रंगत आली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीमुळे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 10 जागा आहेत.
कोल्हापूर लोकसभेला काँग्रेस खासदार निवडून आल्याने काँग्रेसचा 25 वर्षांपासूनचा दुष्काळ संपला. 1998 नंतर प्रथमच काँग्रेसचा खासदार विजय मिळवला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या वर्चस्वानंतर महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले खरे परंतु, विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आणि बंडखोरीचे पेव फुटले. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, इचलकरंजी, राधानगरी आणि चंदगड येथे बंडाची लागण झाली आहे. सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढती होत असून दहा जागांसाठी 121 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातच अत्यंत नाट्यमय घडामोडीत कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे हात हे चिन्ह गायब झाले आहे.
बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, दुसर्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतल्याचे राज्यात दिसत असताना कोल्हापूर जिल्ह्यात विरोधकांना उघडपणे मदत करणार्या अशा कार्यकर्त्यांसोबत कारवाई ऐवजी सबुरीची भूमिका सर्वपक्षांनी घेतल्याची चर्चा आहे.
कागलमध्ये संजय घाटगेंच्या मैत्रीधर्माने मुश्रीफांचे बळ वाढले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत होत आहे ती कागलमध्ये. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांच्यात निकराची लढत होत आहे. या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाली आहे. येथे पाच वेळा आमदार झालेले मुश्रीफ यांना शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे त्यांचे महाविद्यालयीन मित्र आव्हान देत आले आहेत. या दोघांची लढत नुरा कुस्ती म्हणून पाहिली जात असे.
या वेळेला संजय घाटगे यांनी त्यांचा कारखाना उभारण्यास मदत केल्याची परतफेड म्हणून आपली ताकद मुश्रीफ यांच्या पाठीशी उभी केल्याने त्यांचे बळ वाढले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने घाटगे हे आघाडीधर्माचे पालन करीत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारात दिसायला हवेत. पण ते सध्या मैत्रीधर्म निभावत मुश्रीफ यांच्या प्रचारात धडाडीने उतरले आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी आघाडी धर्माचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण आपलेच काही पदाधिकारी विरोधकांना मदत करत असताना यावर त्यांनी मौन पाळले.
पन्हाळा-शाहूवाडीत कोरे- सरूडकर पारंपारिक सामना
पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघांमध्ये जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर हा पारंपारिक सामना होत आहे. येथे काँग्रेसशी संबंधित करण गायकवाड, अमर पाटील हे प्रमुख युवा नेते उघडपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत.
इचलकरंजी मतदारसंघात भाजपचे राहुल आवाडे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्या लढत होत आहे. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, माजी नगरसेवक प्रमोद पाटील हे तुतारीच्या प्रचारात उतरले आहेत. शिरोळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात रंगतदार सामना होत आहे. येथे भाजपशी सबंधित यादव काका पुतणे काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना साथ देत आहेत. अन्य मतदारसंघांमध्येही काही कार्यकर्ते असेच विरोधी गटाची तळी उचलताना दिसत असले तरी याबाबत सध्या तरी कारवाई ऐवजी सारे आलबेल दिसत असल्याने राजकारणातील निष्ठेची चर्चा होत आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये दोन राजेशमध्ये लढत
कोल्हापूर उत्तरमध्ये बहुरंगी लढतीत 11 उमेदवार आहेत. मधुरिमाराजे यांच्या माघारीनंतर महाविकास आघाडीने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले बंडखोर उमेदवार राजेश लाटकर या दोन राजेशमध्ये लढत होत आहे.
कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील-महाडिक पुन्हा संघर्ष
कोल्हापूर दक्षिणमध्ये विरोधकांचा पुन्हा एकदा सामना होत आहे. या सामन्यात दोनवेळा पाटील गटाने तर एकदा महाडिक गटाने बाजी मारली आहे. आता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे पुतणे व काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात सलग दुसर्यांदा चुरशीचा सामना होत आहे. तेथे 11 उमेदवार रिंगणात आहेत.
करवीरला जनसुराज्यची बंडखोरी
करवीरमध्ये काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसने तेथे त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांचे पारंपरिक विरोधक शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात लढत होत आहे. येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे.
राधानगरीत मेहुणे-पाहुणे
राधानगरी भुदरगड मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार के. पी. पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांच्यात सामना होत आहे. विशेष म्हणजे के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी केली आहे. येथून सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
इचलकरंजीत महायुतीत बंडखोरी
इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. इचलकरंजीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली असून तेथे 13 उमेदवार रिंगणात आहेत. येथील विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत.
चंदगडला दोन्हीकडे बंडखोरी
चंदगड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदाताई बाभूळकर यांच्यात सामना आहे. काँग्रेसचे बंडखोर विनायक पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मानसिंग खोराटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघानाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
हातकणंगलेत तिरंगी लढत
हातकणंगले येथून विद्यमान आमदार काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. डॉ. मिणचेकर यांच्या उमेदवारीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही त्यांचा सामना करावा लागणार आहे. या मतदार संघात 16 उमेदवार रिंगणात आहेत.
शिरोळला तिरंगी
शिरोळला विद्यमान आमदार स्वतंत्र निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे स्वतःच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून रिंगणात आहेत. ते महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे गणपतराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील असा तिरंगी सामना आहे. येथे दहा उमेदवार रिंगणात आहेत.