Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रसांगली जिल्ह्यात दिग्गजांच्या लक्षवेधी लढतींमुळे उत्सुकता शिगेला

सांगली जिल्ह्यात दिग्गजांच्या लक्षवेधी लढतींमुळे उत्सुकता शिगेला

राजेंद्र पाटील

स्व. वसंतदादा पाटील, स्व. आर आर पाटील, स्व.पतंगराव कदम यांच्यासारखे दिग्गज नेत्यांपासून, जयंत पाटील, विश्वजीत कदम, सुरेश खाडे, रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्यात बड्या नेत्यांची फौज आहे. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. तर एक लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इथे अपक्ष विशाल पाटील विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली.

- Advertisement -

लोकसभेला महायुतीची घोडदौड सांगलीत रोखली. लोकसभेला जिल्ह्यातील आठ पैकी सात मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार मागे पडले. त्यामुळे विधानसभेला जिल्ह्यातील महायुतीचे नेते सावध झाले आहेत. परंतु, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेली सांगलीची जनता महायुती की महाविकास आघाडीला विजयी गुलाल लावणार, याचीच उत्सुकता आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते. लोकसभेला मतदार राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेऊन मतदान करतात. परंतु विधानसभेला मतदारसंघातील व तालुक्यातील प्रमुख प्रश्नांवर निवडणूक लढविली जाते. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यातील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.

लाडकी बहीण, कृषिपंपाची वीज बिले माफ, तीन गॅस सिलिंडर मोफत, मुलींचे शिक्षण मोफत अशा थेट लाभ देणार्‍या योजना सुरू केल्या. याशिवाय विविध समाज घटकांना व कामगार संघटनांना स्वतंत्र महामंडळांची घोषणा केली. आचारसंहितेपूर्वी महायुतीने सात आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने मिरजेतून माजी महापौर इद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली. महिनाभरात एकामागून एक लाभाचे निर्णय घेतले. त्यापार्श्वभूमीवर मतदार कोणाला कौल देणार याची उत्सुकता ताणली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन, काँग्रेसचे व भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर शिंदेसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे एक असे जिल्ह्यातील राजकीय संख्याबळ आहे. मात्र, उद्धवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही.

सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी कायम
सांगलीत काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे. त्यामुळे सांगलीत आता भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. विधानसभेत सलग दोनवेळा विजयी झालेले आमदार सुधीर गाडगीळ यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, गाडगीळ यांना पर्याय नसल्याने पुन्हा त्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मिरजेत भाजपचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे विरुद्ध शिवसेना (उबाठा) उमेदवार तानाजी सातपुते यांच्यात दुरंगी लढत होत आहे. वंचितचे विज्ञान माने हे निवडणूक रिंगणात आहेत. सुरेश खाडे हे सलग चारवेळा आमदार झाले आहेत. पाचव्यांदा आमदार होण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून त्यांना विविध खात्यांचा कारभार पाहण्याचा अनुभव आहे.

पडळकरांसमोर बंडखोरीचे आव्हान
भाजपचे जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे. काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे बंडखोर तम्मनगौडा रवि-पाटील अशी चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. भाजप बंडखोर उमेदवार रवि-पाटील यांच्यामागे माजी आमदार विलासराव जगताप यांचे पाठबळ आहे. प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहणार आहे. खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे.

या दोन लढती लक्षवेधी
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार निशिकांत पाटील अशी लक्षवेधी दुरंगी लढत होत आहे. सातवेळा निवडून आलेले आमदार म्हणून जयंत पाटील यांचा नावलौकिक आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास व जलसंपदा अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी मंत्री म्हणून पाहिलेला आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहीत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील, अशी दुरंगी लढत होत आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये महायुतीने एक मोठी खेळी केली आहे. रोहित पाटील यांना तूल्यबळ ठरू शकतील अशा संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय काका पाटील हे सलग 10 वर्ष खासदार होते. तासगाव-कवठेमहांकाळ हे दोन्ही उमेदवारांचे होमपीच आहे. संजय काका पाटील यांचा साखर कारखाना आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर लढणार्‍या संजय काका पाटील यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभव केला. तरीही महायुतीने संजय काका पाटील यांना तासगावमधून रोहित पाटील यांच्याविरोधात उभं केलं आहे. काही दिवसांपूर्वी संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

रोहित पाटील यांचं पारडं जड का ?
रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांच्या लढतीत रोहित पाटील यांचं पारडं थोडं जड आहे. संजय काका पाटील हे पूर्वीपासून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर.आर.पाटील यांचे परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जातात. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांचं पारडं जड यासाठी आहे, कारण मागच्या दीड वर्षांपासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याशिवाय तासगाव महापालिकेत त्यांच्या गटाच वर्चस्व आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांच्याकडे आर.आर.पाटील यांची प्रतिकृती म्हणून पाहिलं जातं. आर.आर.पाटील यांच्यासारखच रोहित पाटील यांचं शांत, संयमी बोलणं आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकले. सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात तासगाव-कवठेमहांकाळमधून विशाल पाटील आघाडीवर होते. ही बाब सुद्धा रोहित पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आहे.

दहा वर्षांनी रंगतोय कदम-देशमुख सामना
पलूस-कडेगाव मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. काँग्रेसचे युवा नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख अशी लक्षवेधी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख सामना दहा वर्षांनी पुन्हा होत आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेसचे कडेगाव-पलूस मतदासंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले युवा आमदार आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपदी अनेक वर्षे त्यांनी काम केलेले आहे. त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. आगामी निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. शिराळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत होणार आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे उमेदवार देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या