Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशस्त्राचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न; पालकमंत्री भुसे यांनी दरोडेखोर पकडला

शस्त्राचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न; पालकमंत्री भुसे यांनी दरोडेखोर पकडला

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महिला व मुलींशिवाय कुणी नसल्याची माहिती असल्याने घरात लुटीसाठी घुसलेल्या चोरट्याने बनावट बंदुकीचा धाक दाखवत दागिने व पैशांची मागणी करत महिलेवर धारदार कैचीने तर मुलीस चावा घेतला. या घटनेने हादरलेल्या दोघा मुलींनी घराबाहेर धाव घेत आरडाओरड केल्याने नागरिक धावून आल्याचे बघताच घाबरलेल्या चोरट्याने टेरेसवर धाव घेत दरवाजा लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेत चोरट्यास मोठ्या शिताफीने बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास जैन स्थानकाच्या पाठीमागे वसाहतीत घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

शहरातील ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट विक्रेते मितेश विनोद दोशी यांचा जैन स्थानकच्या पाठीमागे बंगला आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानातून स्पेअरपार्ट घेणारा कृष्णा अण्णा पवार (40, रा. अयोध्यानगर, सोयगाव) हा मॅकेनिक बंगल्यावर पोहोचून दरवाजा वाजवला. हिमांशी (24) या मुलीने दरवाजा उघडला असता पप्पांनी पाठवले आहे असे कृष्णा याने सांगितल्याने. तिने त्यास घरात घेतले. मात्र घरात घुसताच कृष्णाने बनावट पिस्तूल काढून हिमांशीसह दुसरी मुलगी खुशबू व मितेश यांच्या पत्नी भावना यांना धमकावून दागिने व रोकड काढण्यास सांगितले. मुलींनी प्रतिकार केला असता हिमांशीच्या हाताला कृष्णाने चावा घेत तिला जखमी केले व भावना दोशींच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्या जखमी झाल्या.

या घटनेने हादरलेल्या दोघा मुलींनी घराबाहेर धाव घेतली तर भावना या मधल्या रूममध्ये पळून दरवाजा लावून घेतला. तर घरकाम करत असलेल्या महिलेने वरच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. दोघा मुलींनी बाहेर येऊन आरडाओरड करताच परिसरातील रहिवासी बंगल्याकडे धावून आल्याने कृष्णाने टेरेसवर पळून जाऊन दरवाजा लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह संजय दुसाने, नगरसेवक मदन गायकवाड आदींनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना पाचारण केले.

टेरेसवरून कृष्णा खाली येत नसल्याने अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांना पाचारण केले गेले. बंगल्याच्या बाहेर संतप्त जमाव जमल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दादा भुसे यांनी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन कृष्णा यास तुला कुणी मारणार नाही, पोलिसांच्या स्वाधीन होऊन जा अशी ग्वाही दिल्याने कृष्णा खाली येण्यास तयार झाला. भुसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्वरित बंगल्याच्या टेरेसवर जाऊन कृष्णा यास ताब्यात घेत पोलिसांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी हिमांशी दोशी यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात कृष्णा पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या