श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील भक्तांनी अर्पण केलेल्या देणगीच्या मोजणीदरम्यान झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांनी निवेदन प्रसिद्ध करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभू श्रीरामाच्या कृपेने अनेक शतकांच्या संघर्षानंतर भव्य राममंदिर उभारण्यात आले. अशा पवित्र ठिकाणी भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीत गैरव्यवहार झाल्याचे समोर येणे अत्यंत वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. आपण कधीही न्यासातील कोणतेही पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. प्रभू श्रीरामाची निःस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळणे हेच आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अयोध्या दौर्यासाठी किंवा न्यासाच्या कामासाठी आजपर्यंत न्यासाकडून प्रवासखर्च किंवा कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नसल्याचा दावा त्यांनी केला.
कोषाध्यक्ष म्हणून न्यासाच्या निधीचे लेखापरीक्षण (ऑडिट) नियमितपणे होत असून सर्व आर्थिक नोंदी अधिकृत तपासणीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिरातील खर्च थेट बँक व्यवहारांद्वारे केला जातो. कोणतेही रोख व्यवहार होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. देणगीची मोजणी ज्या विभागात केली जाते, त्या प्रक्रियेशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया स्थानिक विश्वस्त आणि संबंधित अधिकार्यांच्या देखरेखीखाली निश्चित नियमांनुसार पार पडते, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणातील चोरी किती झाली, कधी झाली आणि कशी झाली? याचा तपास सुरू असून, विशेष तपास पथक आणि पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देणगी मोजणी आणि व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भक्तांनी अर्पण केलेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य हिशेाब राहील, अशी सक्षम व्यवस्था उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेवटी, प्रभू श्रीरामाच्या कृपेने सत्य समोर येईल, दोषींना शिक्षा होईल आणि राममंदिरावरील भक्तांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी धर्माचा विजय होवो, जय श्रीराम असा संदेश दिला.




