अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार (दि. 5) अंतिम दिवस आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांसह इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, अर्ज विक्रीचा आकडा तब्बल 846 वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोण रिंगणात उतरते आणि कोण माघार घेते, यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आजअखेर दाखल होणार्या सर्व उमेदवारी अर्जांची उद्या मंगळवार (दि. 6) रोजी छाननी करण्यात येणार असून, बुधवार (दि. 7) रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. माघारीनंतरही ज्या जागांवर निवडणूक टळणार नाही, त्या जागांसाठी 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. विविध तालुक्यांतील कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघांसह अनुसूचित जाती, महिला राखीव, शेतीपूरक, बिगरशेती, ओबीसी आदी मतदारसंघांतून इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही बँक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी दुसरीकडे इच्छुकांची वाढती संख्या नेत्यांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे. विशेष म्हणजे, अर्ज विकत घेतलेल्या 846 इच्छुकांपैकी प्रत्यक्ष किती जण अर्ज दाखल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजचा दिवस केवळ अर्ज दाखल करण्याचा नसून जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची दिशा ठरविणारा ठरणार आहे. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांसमोरही अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अचूक आणि नियमानुसार पार पाडण्याचे आव्हान राहणार आहे.
बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला वेग आला असतानाच विविध गटांतील इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याने सहकाराच्या राजकारणातील पुढील डावपेचांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. आज अर्ज दाखल झाल्यानंतर उद्याच्या छानणीत कोणाचे अर्ज टिकतात आणि त्यानंतर माघारीच्या काळात कोण कोणाच्या गळाला लागते, यावर बिनविरोधचा फॉर्म्युला यशस्वी होतो की निवडणुकीची धूळ उडते, हे स्पष्ट होणार आहे.
बिनविरोधच्या घोषणेने इच्छुकांना जोश !
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा नेत्यांकडून करण्यात आली असली, तरी या घोषणेनंतरच इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. बिनविरोध करायचे असेल तर आधी आपले नाव चर्चेत आणावे, या मानसिकतेतून अनेकांनी अर्ज खरेदी केल्याची मिश्कील चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. त्यामुळे बिनविरोधच्या घोषणेने निवडणूक शांत होण्याऐवजी इच्छुकांना जोष आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आज दाखल होणार्या अर्जांकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज सभापती राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, जयश्री थोरात, आमदार विवेक कोल्हे, प्रतापसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, आमदार अक्षय कर्डिले, सचिन जगताप यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांकडून अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शनाची तयारीही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ताकद दाखविण्याचीही संधी साधली जाणार आहे.




