अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे एकत्र बसून तोडगा काढतील. कोणाला लांब ठेवण्याचा या प्रक्रियेपासून कोणाला लांब ठेवण्याचा प्रश्नच नाही. यासंदर्भात राम शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्या पदाचा मानसन्मान ठेवून, त्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी खासदार सुजय विखे यांनी दिले आहे.
माजी खासदार सुजय विखे यांच्या या वक्तव्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार काय, या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. माजी खासदार विखे रविवारी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समवेत एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुजय विखे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का, या शक्यतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी 20 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. मी बोललो तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. त्यामुळे मी निश्चयपूर्वक कमी बोलतो आहे.
बिनविरोध करण्यासाठी कमी बोलतो आहे. ज्यांच्या मागे मते नाहीत, अशा लोकांबरोबर चर्चा करण्यात काय अर्थ आहे. याचा अर्थ आम्ही घाबरलो, विपरीत परिणाम होणार म्हणून अशी भूमिका घेत आहोत असा काहींनी गैरसमज करून घेतला आहे. त्यांनी तो गैरसमज दूर करावा. आम्ही निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत. आमचे आयुष्य निवडणूक लढवण्यात गेले आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन सामंजस्याने भूमिका घ्यावी लागते. माध्यमांसमोर कितीही आवेशात बोलले, पण त्याच्या पाठीमागे किती मते आहेत हे विचारात घेणे आवश्यक आहे. वेळ आणली तर आम्ही निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत, असाही इशारा सुजय विखे यांनी दिला.
तीन अपत्यांमुळे सभापती राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यास कायदेशीर अडचणी निर्माण होणार असल्याची चर्चा आहे, याकडे लक्ष वेधले असता सुजय विखे म्हणाले, वादग्रस्त विषयावर मला बोलायला लावू नका. प्रतिस्पर्धी आमदारांनी मुद्दा उपस्थित केल्याने फुगा फुगला आहे. कोण उमेदवार असेल यापेक्षा समन्वयाने तोडगा निघाला पाहिजे. समन्वयातून शिंदे यांचे मत विचारात घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही. त्यांच्या पदाचा मानसन्मान ठेवूनच निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
संगमनेरच्या बैठकीचा निरोप थोरात यांनी दिला
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात संगमनेर येथे झालेल्या बैठकीवरही डॉ. विखे यांनी भाष्य केले. ही बैठक आम्ही बोलावलेली नव्हती, तर बाळासाहेब थोरात यांनी बोलावली होती. त्यामुळे बैठकीच्या निरोपाबाबतचे प्रश्न थोरात यांनाच विचारले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंच्या संबंधितांना एकाच पद्धतीने बैठकीचे निरोप देण्यात आले होते, असा दावाही डॉ. विखे यांनी केला. त्यामुळे संगमनेर बैठकीच्या निमंत्रणावरून सुरू असलेल्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.




